

Jamner Child Abuse Case
जळगाव : जामनेर शहराला हादरवून सोडणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना मदनी नगर भागात उघडकीस आली आहे. दळण आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १० वर्षांच्या निष्पाप बालकाचा गैरफायदा घेत, एका २५ वर्षीय नराधमाने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहे.
मदनी नगर भागात राहणारा १० वर्षीय पीडित मुलगा मंगळवारी (दि. २१) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरातून दळण आणण्यासाठी गेला होता. यावेळी आरोपी साद खान जहीर खान (वय २५, रा. मदनी नगर) याची वक्रदृष्टी या बालकावर पडली. मुलाच्या अजाणतेपणाचा फायदा घेत आरोपीने त्याला जवळ बोलावले आणि त्याच्याशी अश्लील कृत्य करत अनैसर्गिक अत्याचार केला.
या घृणास्पद प्रकारानंतर, "ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला आणि तुझ्या चुलत्याला जिवंत ठार मारेल," अशी धमकीही आरोपीने दिली. घाबरलेल्या अवस्थेत घरी परतलेल्या मुलाने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.
मुलाच्या आपबितीनंतर त्याचे चुलते शेख इरफान शेख खालीद यांनी तातडीने जामनेर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी साद खान विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे करत आहेत. आरोपी साद खान हा घटना घडल्यापासून फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.