Jalgaon Vidhan Parishad Election Candidate Selection
जळगाव : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जळगाव मतदारसंघासाठी उमेदवाराच्या नावावर अंतिम निर्णय घेतला असून, पक्षश्रेष्ठींनी थेट केंद्रीय स्तरावरून उमेदवारी निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. जळगावच्या राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील विविध तर्क-वितर्कांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
जळगाव येथील ‘जीएम फाउंडेशन’मध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री गिरीश महाजन यांनी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. राज्यातील विधान परिषद निवडणुकीत महायुती सर्व १७ जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत होती. भाजपकडून डॉ. केतकी पाटील, नंदूलाल आडवाणी, अमोल शिंदे तसेच विद्यमान सदस्य चंदूलाल पटेल यांच्या नावांची चर्चा सुरू होती. उमेदवारीबाबत स्थानिक पातळीवर विविध घडामोडी घडत असताना अखेर पक्ष नेतृत्वाने नंदुकुमार महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले जात आहे.
राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुती एकत्रितपणे मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रारंभी जागावाटपाबाबत काही मतभेद असल्याची चर्चा असली तरी आता सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय साधला गेल्याचे चित्र आहे.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गिरीश महाजन म्हणाले, “जळगावची जागा केवळ जिंकायची नाही, तर राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवायचा आहे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागावे.”
विशेष म्हणजे, महाजन यांनी कार्यकर्त्यांना थेट आणि गुप्त रणनीती आखण्याचे आदेश दिले आहेत. "आपल्या हक्काच्या नगरसेवकांची मते तर आपल्याला मिळतीलच, यात शंका नाही. मात्र, समोरच्या (विरोधी) पक्षातील मते आपल्या पारड्यात कशी पाडून घेता येतील, यावरच आपल्याला खरा फोकस करायचा आहे," असा सूचक इशारा देत महाजनांनी विरोधकांच्या गोटात आत्तापासूनच अस्वस्थता निर्माण केली आहे. विरोधकांची मते फोडण्याच्या या नव्या 'विजयाच्या फॉर्म्युल्या'मुळे जळगावच्या राजकीय वातावरणात कमालीची उष्णता वाढली आहे.
दरम्यान, उमेदवारीची घोषणा आणि आगामी रणनीतीमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.