

जळगाव : जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. जळगावात भाजपइतकीच शिवसेनेची ताकद असल्याचा दावा करत शिवसेनेच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे. जागा शिवसेनेला न मिळाल्यास भाजपविरोधात ‘मैत्रीपूर्ण लढत’ देण्याचा निर्णय पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली असून, आता अंतिम निर्णयाची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर येऊन ठेपली आहे.
जळगावात झालेल्या तातडीच्या बैठकीला माजी आमदार तथा जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख श्री. लांडे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत सोनवणे, अमोल पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे आणि महाजन उपस्थित होते.
बैठकीत सर्वांनी एकमताने जळगावची जागा शिवसेनेलाच मिळावी, अशी भूमिका मांडली. तसे न झाल्यास भाजपविरोधात मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी घेऊन जिल्ह्यातील आमदारांचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले असून, ते उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
शिवसेनेचा उमेदवार कोण असेल याबाबत बैठकीत गोपनीयता राखण्यात आली. मात्र, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाचे संकेत दिले. “उमेदवार कोण असेल हे लवकरच स्पष्ट होईल, पण तो शिवसेनेचाच असेल,” असे त्यांनी सांगितले. यासोबतच “प्रताप पाटील काही काँग्रेसमध्ये नाहीत,” असा सूचक टोला त्यांनी लगावला.
या वक्तव्यामुळे गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांच्याच नावावर शिवसेनेची पसंती असल्याची चर्चा अधिक जोर धरू लागली आहे.
बैठकीला आमदार किशोर आप्पा पाटील हे सुमारे अर्धा तास उशिराने पोहोचल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांनी माध्यमांशी बोलताना या चर्चांचे खंडन केले.
मतदारसंघातील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उशीर झाल्याचे त्यांनी स्पष्ट करत, “नाराजीचा प्रश्नच नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरच जागा आणि उमेदवाराबाबत अंतिम निर्णय होईल,” असे सांगितले.
जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असताना शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपची चिंता वाढली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांची मागणी मान्य करणार की महायुतीतील समन्वय राखण्यासाठी माघार घेण्याचा सल्ला देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीनंतर जळगावच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.