Gulabrao Patil Pudhari
जळगाव

Gulabrao Patil | ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’; विरोधकांच्या टीकेला गुलाबराव पाटलांचा टोला

‘ज्याला जायचंय तो जाईल’; वीज, पीक विमा, पावसाची स्थिती आणि अवैध धंद्यांवर पालकमंत्र्यांची अधिकाऱ्यांना तंबी

पुढारी वृत्तसेवा

Gulabrao Patil Opposition Criticism

जळगाव : विरोधकांच्या टीकेला फार महत्त्व देण्याची गरज नाही. ज्यांना जायचे आहे ते जातील आणि ज्यांना बोलावले आहे तेही जातील, असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना लगावला. ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न असतात,’ असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील उद्योजकांच्या वीज समस्या, पीक विमा, खरीप पिकांची स्थिती तसेच अमली पदार्थ व अवैध धंद्यांवरून संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

उद्योजकांच्या वीज समस्यांसाठी महिन्याची मुदत

गेल्या आठवड्यात उद्योजक, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी पुन्हा प्रत्यक्ष आणि ऑनलाइन बैठक घेण्यात आली. शहर आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून, १३२ केव्ही, ११ केव्ही, ५ केव्ही उपकेंद्रांसह जागेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे उद्योजकांच्या सुमारे ७० टक्के समस्या सुटतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

१६ कोटींचा विमा हप्ता; परतावा मात्र सव्वा कोटी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी तब्बल १६ कोटी रुपये भरले असताना विमा कंपन्यांकडून केवळ सव्वा कोटी रुपयांचा परतावा मिळाल्याचा मुद्दा बैठकीत गाजला. याबाबत पालकमंत्री पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे मूल्यांकन कोणत्या निकषांवर केले, याची सखोल चौकशी करण्यात येईल. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा परतावा का मिळाला नाही, याचा जाब संबंधित विमा कंपन्यांकडून मागविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसांत पाऊस नाही तर परिस्थिती बिकट

जिल्ह्यातील खरीप पिकांच्या परिस्थितीबाबतही पाटील यांनी चिंता व्यक्त केली. हलक्या व बरड जमिनीवरील सोयाबीन, मका, उडीद आणि मूग ही पिके मोठ्या संकटात सापडली आहेत. मध्यम व काळ्या कसदार जमिनीतही जेमतेम दोन ते तीन दिवसांचा ओलावा शिल्लक आहे. पुढील दोन दिवसांत पाऊस न झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

कृत्रिम पावसाचे प्रयोग सर्वत्र यशस्वी होत नसल्याने सध्या पावसासाठी देवावरच भिस्त ठेवावी लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर

संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला. ‘राऊतांनी फक्त गटच पाहावेत. आम्हाला मिशन टायगरबद्दल काही माहिती नाही. आमचे शिंदे बाबा काय करतात, ते त्यांनाच माहीत. जळगावात मात्र आमचे मिशन ग्रामीण जोरात सुरू आहे,’ असे ते म्हणाले. भुसावळ आणि शेंदुर्णी येथील नगरसेवक आमच्यासोबत आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

१० रुपयांच्या ‘पावचा’ दारूविरोधात कारवाईचे आदेश

जिल्ह्यातील अमली पदार्थ आणि अवैध धंद्यांच्या मुद्द्यावरही पालकमंत्र्यांनी पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले. अमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, यापूर्वी पाच किलो एमडी तसेच नशिराबाद येथे तीन किलो गांजा जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अवैध दारूभट्ट्या आणि सट्टा अड्ड्यांवरही कारवाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, सध्या बाजारात अवघ्या १० रुपयांना मिळणारी ‘पावचा’ दारू तरुणाईसाठी घातक ठरत असल्याचे पाटील यांनी नमूद केले. विषारी दारूमुळे वर्षभरात अनेकांचे जीव धोक्यात येत असल्याने अशा दारूच्या अड्ड्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT