Jalgaon Fox Attack | शेवऱ्यापाड्यात थरार: पिसाळलेल्या कोल्ह्याचा ३ वर्षीय बालिकेवर जीवघेणा हल्ला; बचावासाठी धावलेले दोघांनाही गंभीर चावा!

​धानोरा-अडावद वनक्षेत्रात खळबळ : चिमुरडी गंभीर जखमी, चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू; हल्ल्यानंतर कोल्ह्याचा मृत्यू
जखमी बालिकेवर उपचार सुरु आहेत
जखमी बालिकेवर उपचार सुरु आहेत
Published on
Updated on

​ जळगाव : चोपडा तालुक्यातील धानोरा-अडावद वनक्षेत्रातील शेवऱ्यापाडा येथे गुरुवारी सकाळी रक्ताचा थरार उडाला. शौचासाठी घराबाहेर पडलेल्या एका तीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर पिसाळलेल्या कोल्ह्याने अचानक झडप घालून तिला रक्तबंबाळ केले. बालिकेचा आक्रोश ऐकून तिला वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने धावलेल्या दोघांवरही कोल्ह्याने तुटून पडत गंभीर चावा घेतला. या हल्ल्यात चिमुरडीसह दोघे जखमी झाले असून, हल्ल्यानंतर कोल्ह्याचा मृत्यू झाला आहे.

​नेमकी घटना काय?

शेवऱ्यापाडा येथील तीन वर्षीय समरिता सतीश बारेला ही चिमुरडी गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घराबाहेर शौचास गेली होती. दबा धरून बसलेल्या पिसाळलेल्या कोल्ह्याने अचानक तिच्यावर हल्ला चढवला. कोल्ह्याच्या तावडीत सापडलेली समरिता जिवाच्या भीतीने ओरडू लागताच, शेजारी असलेले लोका हिरामन बारेला (वय ३०) आणि धनसिंग नुरा बारेला (वय ४०) यांनी तात्काळ तिच्या दिशेने धाव घेतली. मात्र, पिसाळलेल्या कोल्ह्याने बालिकेला सोडून या दोघांवरही हिंसक हल्ला चढवला व दोघांनाही चावा घेऊन जखमी केले.

​उपजिल्हा रुग्णालयात उपचार, परिसरात दहशत

घटनेनंतर तिन्ही जखमींना तातडीने अडावद येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या मदतीने त्यांना पुढील उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर चिमुरडी समरिता हिच्यावर खबरदारी म्हणून पुढील दोन दिवस रुग्णालयात उपचार सुरू राहणार आहेत.

​उनपदेव येथे कोल्ह्याचे दहन

दरम्यान, हल्ल्याच्या झटापटीत कोल्ह्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे वृत्त समजताच सहाय्यक वनसंरक्षक एम. बी. पाटील, वनपाल योगेश साळुंखे, वनरक्षक रुपेश तायडे यांच्यासह वन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश कुलदीपकर यांनी पंचांसमक्ष तपासणी केल्यानंतर उनपदेव येथे कोल्ह्यावर अंत्यसंस्कार (दहन) करण्यात आले. या घटनेमुळे पाड्यातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, वनविभागाने रात्रीची गस्त वाढवून ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news