NCP Sharad Pawar Group Dilip Khodpe Nomination
जळगाव: विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदारसंघातून थेट संकटमोचक गिरीश महाजन यांना 'काट्याची टक्कर' देणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते दिलीप खोडपे आता विधान परिषदेच्या आखाड्यात उतरले आहेत. महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा झालेली नसतानाही, दिलीप खोडपे यांच्यासह अशोक लाडवंजारी, सुनील माळी, किरण राजपूत आणि राजू मोरे यांनी मंगळवारी (दि.२६) जळगावातून नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) विकत घेतले .
जळगाव जिल्ह्याचे राजकीय तापमान सध्या उन्हाळ्याच्या पाऱ्यासारखे कडाडले आहे. उमेदवार निश्चित होण्यापूर्वीच इच्छुकांनी शड्डू ठोकल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.
एकीकडे विरोधी पक्षातून खोडपे सरांनी थेट मैदानात उडी घेतली असताना, सत्ताधारी महायुतीमध्ये मात्र अद्याप 'बिघाडी' कायम असल्याचे चित्र आहे. ही जागा भाजप लढवणार की शिवसेना (शिंदे गट), याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. असे असूनही, उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांकडून मुंबईपर्यंत जोरदार लॉबिंग सुरू आहे.
शिवसेनेने या जागेवर आधीच आपला दावा ठोकला असून, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सुपुत्राचे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्यामुळे शिंदे गट ही जागा सोडण्यास तयार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिलीप खोडपे सर यांनी अर्ज खरेदी केला असला, तरी महाविकास आघाडीत अजून एकवाक्यता नसल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीचे निरीक्षक भास्कर काळे आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी "महाआघाडीच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणतीही अंतिम चर्चा झालेली नाही" असे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनेही आपले स्वतंत्र दंड थोपटले आहे. अधिकृत तिकीट कुणाला मिळणार आणि कोण बंडखोरी करणार, याच चिंतेने सध्या जळगावच्या दोन्ही प्रमुख आघाड्यांमधील नेत्यांची धडधड वाढवली आहे.
विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे बलाबल जरी नसले तरी निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही. राजकारणात काही होऊ शकते. त्यांच्याकडे दुखी लोक आम्हाला सहकार्य करू शकतात. वरिष्ठांच्या सांगण्यावरून अर्ज घेतलेले आहेत- प्रा. दिलीप खोडपे (राष्ट्रवादी काँग्रेस , शरद पवार)
जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दोन दिवसांत इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नसतानाही, तब्बल २७ इच्छुकांनी ४१ नामनिर्देशन अर्जांची खरेदी केली आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी १६ इच्छुकांनी २६ अर्जांची खरेदी केली होती, तर दुसऱ्या दिवशी ११ जणांनी १५ अर्ज घेतले. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत एकूण ४१ अर्जांची विक्री झाली आहे.