जळगाव : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ३० आणि ३१ जुलै रोजी संपूर्ण जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. ३० तारखेच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर आज सकाळी ११:३० वाजेपर्यंत कायम होता. या पावसामुळे कोरड्या पडणाऱ्या पिकांना संजीवनी मिळाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे काही भागांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे.
पारोळ्यात भिंत कोसळून वृद्धाचा जागीच मृत्यू
पारोळा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसंत नगर येथे एक दुर्दैवी घटना घडली. पावसामुळे घराची कच्ची भिंत अंगावर कोसळल्याने बाबू कल्लू जाधव (वय ७५, रा. वसंत नगर, पारोळा) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी घरात झोपलेले असताना अचानक भिंत अंगावर आल्याने हा अपघात घडला.
अंमळनेरमध्ये डोक्याएवढे पाणी; चाळीसगावचे अभियान संशयात
अंमळनेर तालुक्यातही पावसाने रौद्ररुप धारण केले. अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात डोक्याएवढे पाणी साचल्याने दाणादाण उडाली असून पाण्याच्या वेगात दोन जनावरे (म्हशी) ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच परिसरातील पिंपरे नाल्याला मोठा पूर आला आहे.
दुसरीकडे, मुक्ताईनगर येथील महाराजस्व अभियान रद्द करण्यात आले आहे चाळीसगाव येथे ३१ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेले 'महाराजस्व अभियान' या अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे होणार की रद्द होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सावदा, रावेरसह जिल्ह्याच्या सर्वच भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
हतनूरचे ३६ दरवाजे उघडले ; तापी नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा
हतनूर धरण क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. आज सकाळी १०:४० वाजेच्या अहवालानुसार, हतनूर धरणाचे ४१ पैकी ४ दरवाजे पूर्णपणे, तर ३२ दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत तापी नदीपात्रात १,८५,८२८ क्युसेक इतका विसर्ग सुरू असून, पुढील काही तासांत हा विसर्ग ३,५०,००० ते ३,७५,००० क्युसेक पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तापी नदीकाठच्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गिरणा धरण ९५.९१% भरले
जिल्ह्याची पाण्याची धुरा सांभाळणारे गिरणा धरण क्षेत्रातही पाण्याची आवक सुरू आहे. ३१ जुलै रोजी सकाळी ६:०० वाजेच्या नोंदीनुसार, गिरणा धरणात ९५.९१% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात १६ मिमी पावसाची नोंद झाली असून ३६२.८५ दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे. सध्या धरणाचे सर्व रेडियल गेट्स बंद असून सांडव्यावरून अथवा कालव्यातून विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.Heavy rain Jalgaon
मळनेर चोपडा व पारोळा येथील परिस्थिती गंभीर
जिल्ह्यात सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अमळनेर चोपडा व पारोळा येथील परिस्थिती गंभीर आहे. मुक्ताईनगर येथे जोरदार पाऊस झाल्यामुळे महाराजस्व अभियान ते रद्द करण्यात आलेले आहेत तर चाळीसगावचा ही निर्णय लवकरच घेण्यात येईल तसेच नागरिकांनाही आव्हान करण्यात आले की जोरदार पाऊस सुरू असल्याने तालुक्या ठिकाणी येऊ नये आलेल्यांना आपण महा राजस्व अभियानाचा लाभ दिलेला आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत आपत्ती व्यवस्थापनाचे तसेच इतर विभाग ही कोणतेही आपत्तीसाठी सज्ज आहे.