

Jalgaon rainfall damage
जळगाव : जिल्ह्यात 16 व 17 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसासह विजेच्या तडाख्यामुळे शेतपिकांचे, घरांचे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले. रावेर, अमळनेर, भडगाव, जळगाव, पारोळा, एरंडोल, बोदवड आणि पाचोरा तालुक्यातील अनेक गावे बाधित झाली आहेत.
पूर व वादळी पावसामुळे काही ठिकाणी घरांचे छत कोसळले, तर बक्षीपुर येथे भिंत कोसळून सात ते आठ शेळ्यांचा मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यात पातोंडा व नांद्री गावात पुराचे पाणी शिरल्याने बाधित कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत व स्थानिक भवनात स्थलांतरित करण्यात आले. प्रशासनाने त्यांच्या निवास व अन्नाची तातडीने व्यवस्था केली आहे.
भडगाव व जळगाव तालुक्यात कपाशी, ऊस व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून, बोदवड तालुक्यात झाड कोसळून एका घराचे नुकसान झाले. पाचोरा तालुक्यातील लासगाव व सामनेर भागातही शेतीचे नुकसान झाले आहे.
प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने दौरे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांची विचारपूस केली. महसूल विभागाने पंचनामे सुरू केले असून शासकीय मदत व नुकसानभरपाईची प्रक्रिया जलदगतीने राबवली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतत संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे.