Hatnur Dam Discharge  Pudhari
जळगाव

Hatnur Dam | हातनूर धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस: 66.88 टक्के पाणीसाठा; विसर्ग सुरू

पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे दोन रेडियल गेट प्रत्येकी 0.25 मीटरने उघडण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Hatnur Dam Discharge

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या जलव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा दमदार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या पाण्याच्या आवकेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आला असून, सध्या धरणात 66.88 टक्के एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जून ते 23 जुलै या कालावधीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2,334 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 117.4 मिमी पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक लक्षणीय वाढली आहे.

23 जुलै रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत धरणाची जलपातळी 211.550 मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, धरणाची पूर्ण जलाशय पातळी 214.000 मीटर आहे. सध्या धरणात 259.50 दशलक्ष घनमीटर (66.88 टक्के) एकूण पाणीसाठा असून, त्यापैकी 126.50 दशलक्ष घनमीटर (49.61 टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे दोन रेडियल गेट प्रत्येकी 0.25 मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून 37 क्युमेक्स (1,307 क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कालव्यातून 5.66 क्युमेक्स (200 क्युसेक) पाणी सोडण्यात येत आहे. आर.एस. गेटमधून सध्या कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

पाणलोट क्षेत्रातील विविध ठिकाणीही चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. अकोला येथे 28.6 मिमी, चिखलदरा 24 मिमी, बऱ्हाणपूर 13.06 मिमी, लोहारा 11 मिमी, गोपालपुरा 6.2 मिमी, एरंडी 2.4 मिमी, दीडतलाई व लखपुरी येथे प्रत्येकी 2.2 मिमी, तर टेक्सा येथे 1.4 मिमी पाऊस झाला. हातनूर परिसरात 16 मिमी पावसाची नोंद झाली असून, या हंगामातील तेथील एकूण पाऊस 149 मिमीपर्यंत पोहोचला आहे.

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने येत्या काही दिवसांत धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT