जळगाव

जळगाव | शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगानुसार पीकविम्याची भरपाई द्या : खासदार उन्मेश पाटील यांची मागणी

गणेश सोनवणे

जळगाव : प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम सन 2023 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा भरपाईची रक्कम प्राप्त झालेली नाही. त्याअनुषंगाने वैयक्तिक नुकसानीचे प्रकार व उत्पन्नावर आधारीत भरपाई निश्चित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविमा रक्कम जमा करण्याची मागणी जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

"प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम सन 2023 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील कपाशी, उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी यासारख्या प्रमुख पिकांचे सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या खंडामुळे तसेच शेवटच्या टप्प्यात पडलेल्या जास्तीच्या पावसाने नुकसान झाले होते. त्यानुसार पीक नुकसानीचे पंचनामे देखील पूर्ण करण्यात आले होते. प्रत्यक्षात आजतागायत संबंधित सर्व शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची विमा रक्कम मिळालेली नाही. दरम्यान, खरीप हंगामातील सर्व पिकांची काढणी पूर्ण होऊन कृषी विभागासह महसूल विभाग व पंचायत समितीकडून पीक कापणी प्रयोग पूर्ण करण्यात आले आहेत. त्याबाबतच्या अहवालास तात्काळ अंतिम स्वरूप द्यावे आणि शेतकऱ्यांना पीक उत्पादनावर आधारीत नुकसान भरपाई मिळवून द्यावी. वैयक्तिक पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना मंजूर नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनीला तातडीने अदा करण्याबाबत आदेशित करावे", असे खासदार उन्मेश पाटील यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT