जळगाव

Jalgaon farmers news | पावसाअभावी पेरण्या रखडल्या; शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

पावसाने आणखी दडी मारल्यास शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे

पुढारी वृत्तसेवा

जळगांव : जून महिना अर्ध्यावर आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. खरीप हंगामाच्या पेरण्या पावसावर अवलंबून असल्याने अनेक भागांतील शेतकरी पाऊस पडण्याची प्रतीक्षा करत आहेत. पेरणी करावी की आणखी काही दिवस थांबावे, अशा संभ्रमावस्थेत शेतकरी सापडला आहे.

खरीप हंगामासाठी शेतकरी एप्रिल महिन्यापासूनच शेताची मशागत, नांगरणी, कुळवणी तसेच इतर पूर्वतयारी पूर्ण करून ठेवतो. त्यानंतर तो पावसाच्या आगमनाची वाट पाहत असतो. यंदा मात्र अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतातील सर्व तयारी असूनही पेरण्या रखडल्या आहेत.

25 मे रोजी रोहिणी नक्षत्र सुरू झाले, तर 7 जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली. पारंपरिकदृष्ट्या मृग नक्षत्रात पेरणीसाठी आवश्यक पाऊस पडण्याची अपेक्षा असते. मात्र यंदा मृग नक्षत्रातही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता 22 जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होत असून, या कालावधीत चांगला पाऊस झाला नाही तर खरीप हंगामावर मोठे संकट येण्याची भीती व्यक्त होत आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल किंवा अन्य सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून काही प्रमाणात पेरणी सुरू केली आहे. मात्र कोरडवाहू क्षेत्रातील शेतकरी पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने त्यांचे डोळे अजूनही आकाशाकडे लागले आहेत.

दरम्यान, यंदा हवामानातील बदलांमुळे पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे केवळ शेतकरीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकही तीव्र उष्णतेमुळे त्रस्त झाले आहेत. अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे.

राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने उपलब्ध जलसाठ्याचा विचार करून धरणांमधील पाणी प्रामुख्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शेती सिंचनासाठी अतिरिक्त आवर्तने सोडली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, वेळेत पाऊस झाल्यास खरीप हंगामाला दिलासा मिळू शकतो. मात्र पावसाने आणखी दडी मारल्यास शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT