

जत : खरीप हंगामाच्या आगमनाची चाहूल लागताच जत तालुक्यातील शिवारात नवचैतन्य संचारले आहे. काळ्या मातीत कष्टाचे सोने पेरण्यासाठी बळीराजा पूर्ण तयारीनिशी सज्ज झाला आहे. मात्र आता शेतकऱ्यांना केवळ पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
तालुक्यातील उमदी, संख, बाज, सोरडी, सोनलगी, तिकोंडी, जालीहाळ, बोबलाद, करजगी, बेळुंखी, निगडी, माडग्याळ, देवनाळ आणि परिसरातील अनेक गावांमध्ये मशागतीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. बहुतेक ठिकाणी पूर्ण झाली आहेत
नांगरणी, वखरणी, कुळवणी यासह बहुतांश मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवर पेरणी यंत्रे बसवून ठेवली आहेत. मका, बाजरी, ज्वारी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि इतर पिकांसाठी आवश्यक बियाणे, खते व औषधांची खरेदीही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. मात्र, पेरणीची प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी शेतकरी दमदार आणि पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत आहेत.
गेल्या काही वर्षांत अपुरा, खंडित आणि अनियमित पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली, तर अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. काही भागांत दुष्काळ, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळेही शेतीचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर यंदा पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभाग आणि तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
सध्या ग्रामीण भागात सर्वत्र एकच चित्र पाहायला मिळत आहे. अंगणात सज्ज असलेले ट्रॅक्टर, त्यावर बसविण्यात आलेली पेरणी यंत्रे आणि आकाशाकडे लागलेल्या शेतकऱ्यांच्या आशावादी नजरा. मागील काही वर्षांत अवकाळी पाऊस, दुष्काळ, कीडरोग, अतिवृष्टी आणि शेतीमालाच्या अस्थिर बाजारभावांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम भरघोस उत्पादन देणारा ठरावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.