Jalgaon Insurance Fraud Case
जळगाव : विमा कंपनीला ५० लाख रुपयांना लुबाडण्यासाठी बनावट अपघाताचा बनाव रचून तपासाची दिशाभूल करणाऱ्या टोळीचा मेहुणबारे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या हायप्रोफाईल फसवणूक प्रकरणात पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या चार पोलीस अंमलदारांसह एक वैद्यकीय अधिकारी आणि खासगी एजंट अशा एकूण १० जणांविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने मृताच्या नावावरील डेबिट कार्डचा वापर करून विमा कंपनीची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
९ जून २०२५ रोजी रात्री ७.४८ वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील जामदा शेतशिवारात हा कट रचण्यात आला होता. आरोपींनी संगनमत करून बनावट साक्षीदार उभे केले आणि एका व्यक्तीचा मृत्यू रस्ता अपघातात झाल्याचा खोटा बनाव रचला. या आधारे मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून विमा कंपनीकडे तब्बल ५० लाख रुपयांचा विमा दावा सादर केला होता.
विमा कंपनीकडून या दाव्याची सखोल चौकशी सुरू होताच आपले बिंग फुटण्याच्या भीतीने संशयीत आरोपी कविता संजय पाटील हिने ५० लाखांचा विमा दावा मागे घेतला. मात्र, त्यानंतर या टोळीने शक्कल लढवत मृताच्या नावावर असलेल्या विमा कंपनीच्या डेबिट कार्डचा गैरवापर केला आणि थेट १० लाख रुपये काढून विमा कंपनीला गंडा घातला.
या गंभीर प्रकरणाची चौकशी चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्याकडे सुरू होती. काल या चौकशीचा अहवाल प्राप्त होताच, त्यातील निष्कर्षांच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार, १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.२८ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्यात सहभागी असलेले पोलीस अंमलदार यापूर्वीही अशाच प्रकारच्या विमा फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये अडकले असून, ते सध्या कारागृहात आहेत. त्यांच्या गंभीर गैरकृत्यांमुळे पोलीस प्रशासनाने त्यांना यापूर्वीच सेवेतून ‘रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस’ केले आहे. तरीही त्यांचे जुने कारनामे आता एकामागून एक समोर येत असल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले करीत आहेत.
बडतर्फ पोलीस अंमलदार: रविंद्र एकनाथ बतोसे (तत्कालीन नेमणूक- मेहुणबारे पो.स्टे.), महेंद्र प्रकाश पाटील (चाळीसगाव शहर पो.स्टे.), सचिन अशोक निकम (मेहुणबारे पो.स्टे.) आणि सुनिल अशोक निकम (चाळीसगाव शहर पो.स्टे.).
इतर आरोपी: वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदर करंबेकर, खासगी एजंट प्रविण मयाराम पाटील (रा. पारोळा), नितेश हिमत पाटील (एरंडोल), आकाश सुनिल पाटील (जुवाडा, ता. भडगाव), प्रेमचंद त्र्यंबक पाटील (एरंडोल) आणि कविता संजय पाटील (एरंडोल).