Jalgaon District Bank Election: जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा; बिनविरोध निवडीतही घराणेशाहीची चर्चा

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत यंदा महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून, निवडणुकीच्या माघारीच्या टप्प्यापर्यंतच महायुतीच्या १२ जागा बिनविरोध विजयी झाल्या आहेत.
Jalgaon District Central Cooperative Bank
Jalgaon District Central Cooperative BankPudhari
Published on: 
Updated on: 

Jalgaon District Bank Election

जळगाव : नरेंद्र पाटील

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (दगडी बँक) निवडणुकीत यंदा महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून, निवडणुकीच्या माघारीच्या टप्प्यापर्यंतच महायुतीच्या १२ जागा बिनविरोध विजयी झाल्या आहेत. मागील निवडणुकीत सर्वपक्षीय आघाडीच्या भरोशावर राहिल्याने भाजपला मोठा फटका बसला होता.

छाननीमध्ये भाजपच्या अनेक दिग्गजांचे अर्ज बाद झाल्याने पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्या अनुभवातून धडा घेत यंदा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी निवडणुकीपूर्वीच अचूक आखणी केली. या रणनीतीमुळे बिनविरोध निवडींमध्ये सर्वाधिक जागा शिवसेनेला, त्यानंतर भाजपला आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मिळाल्या आहेत.

बिनविरोध विजयात आजी-माजी आमदार आणि परिवारांचीच एन्ट्री

महायुतीने या निवडणुकीत मोठे यश मिळवले असले, तरी निवडून आलेल्या नावांवर नजर टाकल्यास सत्तेचे केंद्रीकरण ठरावीक नेत्यांच्या कुटुंबातच झाल्याचे चित्र दिसत आहे. माघारीनंतर बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये दोन मंत्री, एका मंत्र्यांची पत्नी, एक विद्यमान आमदार आणि चार आमदारांच्या परिवारातील सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांपेक्षा लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कुटुंबियांनाच या निवडणुकीत संधी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Jalgaon District Central Cooperative Bank
Jalgaon Bank Election | 'जेडीसीसी' बँकेवर मंत्री पाटील, महाजनांसह 12 उमेदवार बिनविरोध

खडसे परिवाराचे पुनरागमन आणि पडद्यामागील हालचाली

या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा खडसे परिवाराची होत आहे. मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँक 'खडसे मुक्त' करण्याची घोषणा करत त्यासाठी उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. मात्र, राजकीय समीकरणे बदलल्याने माघारीनंतर भाजप नेत्या रक्षा खडसे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत त्यांचे सासरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नेते आमदार एकनाथ खडसे हे पडद्यामागे राहून त्यांना सहकार्य करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

रणनीतीकार मंगेश चव्हाण यांना स्वतःच्याच मतदारसंघात आव्हान

नगरपालिका, विधानसभा असो वा जिल्हा बँक आणि दूध संघ; प्रत्येक निवडणुकीत महायुतीची रणनीती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आमदार मंगेश चव्हाण यांना यंदा स्वतः निवडणुकीचा सामना करावा लागणार आहे. महायुतीच्या इतर जागा बिनविरोध काढण्यात यश आले असले, तरी चाळीसगाव मतदारसंघात चव्हाण यांच्यासमोर विरोधकांचे आव्हान उभे ठाकले आहे.

महाविकास आघाडीला 'जशास तसे' उत्तर

मागील निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वपक्षीय आघाडीचा प्रयोग करून महायुतीला सत्तेपासून दूर ठेवले होते. यंदाही तसाच प्रयत्न झाला, परंतू गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी अत्यंत हुशारीने खेळी करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना ऐनवेळी अलगद बाजूला सारले. सध्या ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील हे निवडणुकीच्या मैदानात कायम असले, तरी बिनविरोध निवडीच्या टप्प्यात महाविकास आघाडीच्या एकाही घटक पक्षाला खाते उघडता आलेले नाही.

एकंदरीत, जळगाव जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत महाजन-पाटील जोडीने आपली राजकीय ताकद सिद्ध केली असून, आता उर्वरित जागांवर होणाऱ्या प्रत्यक्ष मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Jalgaon District Central Cooperative Bank
Jalgaon DCC Bank Election | जळगाव जिल्हा बँकेवर महायुतीचे वर्चस्व! गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, सुमित पाटील बिनविरोध

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.