Bank Nomination Forms Jalgaon DCC Bank
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी प्रमुख नेत्यांनी मैदानात उतरत शक्तिप्रदर्शन केले. मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), अमोल पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्येच जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबतची चर्चा सकारात्मक असली, तरी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील जागांचा तिढा अद्याप कायम आहे. तोडगा न निघाल्यास मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारावा लागेल, असे स्पष्ट संकेत आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले.
अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी निवडणुकीची रणनीती, महायुतीतील जागावाटप, महाविकास आघाडीची भूमिका आणि जिल्हा बँकेच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. जिल्ह्यातील विविध जागांसाठी सुमारे २५० ते ३०० उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
महायुतीच्या जागावाटपाबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेससोबतची प्राथमिक चर्चा जवळपास निश्चित झाली असून ती सकारात्मक दिशेने पूर्ण झाली आहे. मात्र, शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून जागांची अधिक मागणी होत असल्याने त्यांच्यासोबत अद्याप अंतिम सहमती झालेली नाही. याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
राजकारणात सर्व पर्याय खुले असतात. यापूर्वीही महाराष्ट्रात अनेक निवडणुकांमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या आहेत. त्यामुळे जागावाटपावर एकमत झाले नाही, तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. खबरदारीचा भाग म्हणून सर्व प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या आणि कोणाला उमेदवारी द्यायची, हा संबंधित पक्षाच्या अंतर्गत निर्णयाचा विषय आहे. भाजपच्या उमेदवारी आणि जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे आणि पक्षाचे स्थानिक नेतृत्व परस्पर समन्वयातून घेईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीकडून सर्वपक्षीय पॅनेल उभारण्याच्या सुरू असलेल्या चर्चेवरही चव्हाण यांनी भूमिका मांडली. ज्या मतदारसंघात किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गटात महाविकास आघाडीची प्रत्यक्ष ताकद आहे आणि ठराव त्यांच्या बाजूने आहेत, तेथे सहकाराच्या भावनेतून जागावाटपाचा विचार करता येईल. मात्र, केवळ जागांची मागणी करून चालणार नाही. संबंधित पक्षांची प्रत्यक्ष ताकद लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल. याबाबत गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अन्य वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक असून बळीराजाचे हित जपणे हाच निवडणुकीतील प्रमुख अजेंडा असेल, असे चव्हाण यांनी सांगितले. बँकेचा वाढलेला एनपीए आणि आर्थिक अडचणी ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी मान्य केले.
यापूर्वी जिल्हा दूध संघ अडचणीत असताना जबाबदारी स्वीकारून त्याला पुन्हा नफ्यात आणण्यात यश मिळाले. त्याच धर्तीवर जिल्हा बँकेसमोरील आर्थिक आव्हानांवर मात करून बँक सक्षमपणे चालवण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच दहा वर्षांच्या नियमामुळे काही मातब्बर नेत्यांच्या उमेदवारीबाबत निर्माण झालेल्या पेचावर वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी नमूद केले.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून घराणेशाहीला प्रोत्साहन दिले जात असल्याच्या काँग्रेसच्या आरोपावर चव्हाण यांनी जोरदार पलटवार केला. काँग्रेसला नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसमध्येच वर्षानुवर्षे घराणेशाही चालत आली आहे. सहकार क्षेत्रात पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, जनतेने त्यांना नाकारल्याने निर्माण झालेल्या नैराश्यातूनच असे आरोप केले जात असल्याची टीका त्यांनी केली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता महायुतीतील जागावाटपाचा तिढा कसा सुटतो, महाविकास आघाडी कोणती रणनीती आखते आणि प्रत्यक्ष निवडणुकीत कोणते राजकीय समीकरण आकाराला येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.