Jalgaon DCC Bank Election | जळगाव जिल्हा बँक निवडणूक; पहिल्याच दिवशी ३१४ अर्जांची विक्री

रक्षा खडसे, संजय सावकारेंसह दिग्गजांची मोर्चेबांधणी; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस वाढली
Jalgaon Bank Election Nomination Forms
Jalgaon Bank Election Nomination FormsPudhari
Published on: 
Updated on: 

Jalgaon Bank Election Nomination Forms

जळगाव : सहकार क्षेत्रात महत्त्वाची मानली जाणाऱ्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र खरेदीच्या पहिल्याच दिवशी इच्छुकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिवसभरात ९४ जणांनी तब्बल ३१४ नामनिर्देशन पत्रे खरेदी केल्याने निवडणुकीतील चुरस स्पष्ट झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पहिल्याच दिवशी दोन अर्ज दाखल

नामनिर्देशन पत्रांच्या खरेदीसोबतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. विकास सोसायटी मतदारसंघातून यावल तालुक्यातील विनोद कुमार पाटील यांनी पहिल्याच दिवशी दोन नामनिर्देशन पत्रे दाखल केली. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला सुरुवातीलाच गती मिळाली आहे.

Jalgaon Bank Election Nomination Forms
Jalgaon DCC Bank Election | जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; २१ जागांसाठी २९ नोव्हेंबरला मतदान

दिग्गज नेत्यांच्या हालचालींना वेग

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्याच दिवशी नामनिर्देशन पत्रे खरेदी करणाऱ्यांमध्ये केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा विद्यमान आमदार संजय सावकारे, माजी नगराध्यक्षा रजनी सावकारे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांचा समावेश आहे.

दिग्गज नेत्यांसह त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकही निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची ही निवडणूक सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे.

Jalgaon Bank Election Nomination Forms
Jalgaon Crime News: शुल्लक कारण... डोक्यात लोणच्याची बरणी घालून पोटच्या मुलानेच आईलाच संपवलं

निवडणूक यंत्रणा सज्ज

निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शकपणे आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. धुळे जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर एरंडोलचे सहाय्यक निबंधक विशाल ठाकूर आणि सहाय्यक निबंधक डी. व्ही. पाटील हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

पहिल्याच दिवशी ३१४ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाल्याने निवडणुकीतील इच्छुकांची संख्या आणि संभाव्य लढतींबाबत उत्सुकता वाढली आहे. आगामी काळात उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जांची छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ‘दगडी बँक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news