crime news File Photo
जळगाव

Jalgaon crime: गुरूजींचा ‘काळा’ कारनामा; संतप्त गावकऱ्यांनी कार पेटवली...

जामठीत तुफान राडा : पोलिसांवर दगडफेक, जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज; मध्यरात्री एसपी घटनास्थळी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पवित्र नात्याला काळीमा फासत अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून जबरदस्तीने कारमध्ये डांबण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजिज खान पठाण (50) या नराधम खासगी शिक्षकाचा प्रताप उघडकीस आल्यानंतर जामठी (ता. बोदवड) येथे प्रचंड उद्रेक झाला. संतप्त गावकऱ्यांनी आरोपीअजिज खान पठाण (50) या शिक्षकाच्या घरावर थेट हल्लाबोल करत त्याची कार जाळून खाक केली.

आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेताना पोलिसांवर दगडफेक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या प्रकरणी बोदवड पोलिसांत ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कार पेटवली, पोलीस ठाण्याबाहेर रणकंदन

खासगी क्लास घेणाऱ्या या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीकडे अयोग्य मागणी करून तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेण्याचा प्रयत्न केला. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच संतप्त ग्रामस्थांचा संयम सुटला. शेकडोचा जमाव थेट आरोपीच्या घरावर चालून गेला. लोकांनी शिक्षकाची कार पेटवून देत त्याला बेदम चोप देण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य ओळखून बोदवड पोलीस तत्काळ गावात पोहोचले आणि त्यांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

‘आरोपीला आमच्या स्वाधीन करा!’

पोलिसांनी आरोपीला वाहनात बसवून पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही जमावाचा संताप शांत झाला नाही. ‘आरोपीला आमच्या स्वाधीन करा’ अशी आक्रमक मागणी करत ग्रामस्थांनी पोलिसांशी झटापट सुरू केली. याच दरम्यान काही जणांनी पोलिसांच्या दिशेने तुरळक दगडफेक केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बचावात्मक पवित्रा घेत सौम्य लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराचे (टिअर गॅस) शेल फोडून जमावाला पांगवले.

जिल्हा पोलीस अधीक्षक मध्यरात्री घटनास्थळी

घटनेची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेत गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला असून सध्या जामठी गावात शांतता आहे. बोदवड पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षक अजिज खान पठाण (50) विरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल रात्री उशिरा दाखल करण्यात आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT