Central Railway  Pudhari
जळगाव

Jalgaon Crime: 'माझ्या मृत्यूसाठी डॉक्टर जबाबदार', व्हिडिओ पोस्ट करत उचलले टोकाचं पाऊल

डॉ. समाधान पाटील (रा. संभाजीनगर) आणि रवींद्र महाजन यांच्यात आर्थिक व्यवहारावरून जुना वाद सुरू होता

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पाचोरा तालुक्यातील संभाजीनगर येथील रहिवासी रवींद्र महाजन यांनी नगरदेवळा रेल्वे पुलापासून सुमारे २०० मीटर अंतरावर रेल्वेखाली धावून आपले जीवन संपवले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हे पाऊल उचलण्यापूर्वी रवींद्र महाजन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

या घटनेबाबत चाळीसगाव रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, स्टेशन मॅनेजरने भडगाव पोलीस ठाण्याला मेमो दिला असून, त्यानुसार भडगाव पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

आर्थिक वादातून झाली होती झटापट

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. समाधान पाटील (रा. संभाजीनगर) आणि रवींद्र महाजन यांच्यात आर्थिक व्यवहारावरून जुना वाद सुरू होता. याच कारणावरून शुक्रवारी सायंकाळी संबंधित हॉस्पिटलमध्ये दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादादरम्यान रवींद्र महाजन आणि डॉक्टरांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर महाजन यांनी सोशल मीडियावर आपण जीवन संपवणार असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता.

भडगाव आणि रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू

व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर रवींद्र महाजन यांनी नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली येऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणाची प्राथमिक नोंद सध्या भडगाव पोलीस ठाण्यात झाली असली, तरी संबंधित घटनास्थळ हे चाळीसगाव रेल्वे पोलिसांच्या (GRP) हद्दीत येते. त्यामुळे पुढील आवश्यक ती कायदेशीर कारवाई रेल्वे पोलिसांकडून केली जात आहे.

नातेवाईक आणि नागरिकांची पोलीस ठाण्यात गर्दी

रवींद्र महाजन यांनी हे पाऊल उचलण्यापूर्वी जाहीर केलेल्या व्हिडिओमध्ये, "माझ्या या निर्णयाला डॉ. समाधान पाटील हेच जबाबदार आहेत," असा थेट आरोप केल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओचा आधार घेऊन संबंधित डॉक्टरांवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृत रवींद्र यांच्या नातेवाईकांनी आणि समाजबांधवांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी भडगाव पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT