Sambhajinagar Encroachment |शहागंजमध्ये अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान गोंधळ; मनपा अधिकाऱ्याला गोळी मारण्याची धमकी

नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; संतप्त शिवसैनिकांकडून तरुणाला मारहाण
Sambhajinagar Municipal Officer Death Threat
Sambhajinagar Municipal Officer Death ThreatPudhari
Published on
Updated on

Sambhajinagar Municipal Officer Death Threat

छत्रपती संभाजीनगर : शहागंज परिसरात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकाला सोमवारी (दि. १) सायंकाळी विरोधाचा सामना करावा लागला. कारवाईदरम्यान एका फळविक्रेत्याने मनपा अधिकाऱ्याशी हुज्जत घालत त्यांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची घटना घडली.

त्यानंतर परिसरातील वातावरण आणखी तापले. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांच्याबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी संबंधित तरुणाला मारहाण केली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहागंज परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा एका व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Sambhajinagar Municipal Officer Death Threat
Sambhajinagar News : जनगणना कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबाला न्याय द्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहागंजमधील सुलतान ड्रायफ्रुट्ससमोर रस्त्यावर हातगाड्या उभ्या करून फळविक्री होत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत होती. यामुळे महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई हाती घेतली होती. सोमवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास इमारत निरीक्षक आसिफ साहेबलाल शेख हे अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या निर्देशानुसार कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचले होते. त्यांच्यासोबत सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, रमेश गायकवाड, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ, बिलाल बसरारी तसेच नागरी मित्र पथक उपस्थित होते.

कारवाई सुरू असताना सिकंदर (पूर्ण नाव उपलब्ध नाही) याने आसिफ शेख यांच्याशी वाद घालत धक्काबुक्की केली. तसेच, “कोणतेही अधिकारी येऊ द्या, आम्हाला पोट भरू द्या; अन्यथा तुम्हाला गोळ्या मारल्या जातील,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आसिफ शेख यांच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिसांनी सिकंदरविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल शिंदे करीत आहेत.

Sambhajinagar Municipal Officer Death Threat
Sambhajinagar News : महापालिकेतील २५० फाईलींना अचानक गती

व्हायरल व्हिडिओनंतर वाढला तणाव

शहागंज परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली असून यापूर्वी त्यांनी प्रशासनाला अल्टिमेटमही दिला होता. त्यानंतर महानगरपालिकेने कारवाई केली होती. मात्र पुन्हा अतिक्रमण झाल्याने सोमवारी पथकाने कारवाई सुरू केली.

याच दरम्यान एका व्यक्तीने रस्त्यावर खुर्ची टाकून बसत आयुक्त आणि नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी संबंधित तरुणाला शोधून मारहाण केली. त्यानंतर त्याने सार्वजनिकरीत्या माफी मागितल्याची माहिती मिळाली. तरीही रात्री उशिरा पुन्हा तणाव निर्माण झाल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त शहागंज परिसरात तैनात केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news