जळगाव

Jalgaon crime news | जळगावात 'विमल'चा बंपर स्टॉक जप्त; एमआयडीसी पोलिसांची डिझो पेट्रोल पंपाजवळ धडक कारवाई

धरणगावच्या 'जोगेंद्र'ला बेड्या; तब्बल २८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : महामार्गावर सापळा रचून प्रतिबंधित गुटख्याची मोठी खेप पकडली आहे. मंगळवारी ९ जून च्या रात्री अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान असलेल्या डिझो पेट्रोल पंपाजवळ ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २१ लाख ६१ हजार रुपये किंमतीचा विमल सुगंधित गुटखा आणि ७ लाखांची बोलेरो पिकअप असा एकूण २८ लाख ६१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी धरणगाव तालुक्यातील फुलपाट येथील संशयित आरोपी जोगेंद्र भिका पाटील याला पोलिसांनी जागेवरच बेड्या ठोकल्या आहेत.

शहरातून महामार्गाच्या मार्गे प्रतिबंधित गुटख्याची मोठी तस्करी होणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ विशेष पथक तयार करून डिझो पेट्रोल पंप परिसरात फिल्डिंग लावली.

संशयास्पद स्थितीत येणारी महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच 19 सी एक्स -३२६० दिसताच पोलिसांनी ती रोखली. वाहनाची कसून झडती घेतली असता, गाडीत पांढऱ्या गोण्यांमध्ये ठासून भरलेला बंदी असलेला विमल गुटखा आणि पानमसाला आढळून आला. पोलिसांनी एकूण ५८ गोण्या जप्त केल्या आहेत.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२३, २७५, २७४ आणि २२३ अन्वये गुन्हा (रजि. क्र. १५७/२०२६) दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत? हा गुटखा जळगावात कोणासाठी आणला जात होता? याचा शोध आता पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करत आहेत.

सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पीएसआय चंद्रकांत धनके, एएसआय विजयसिंग पाटील, हेड कॉन्स्टेबल गिरीश पाटील आणि लाडवंजारी यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या ' कारवाईमुळे जळगावच्या गुटखा किंगचे धाबे पुरते दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT