Assault Crime Pudhari
जळगाव

Jalgaon crime : बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग; शालकाकडून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

जामनेर तालुक्यातील तोरणाळे जंगलातील घटना; डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न, संशयित अटकेत

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून शालकाने मेहुण्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तोरणाळे शिवारातील जंगल परिसरात झालेल्या या हल्ल्यात मेहुणा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फत्तेपूर येथील सुभाषपुरा भागातील रहिवासी प्रशांत सुभाष चौधरी (वय २६) यांनी वडगाव सहो येथील अभिषेक संतोष मोरे (वय १९) यांच्या बहिणीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहामुळे अभिषेकच्या मनात प्रशांत यांच्याविषयी सूडाची भावना निर्माण झाली होती. २७ जुलै रोजी अभिषेकने प्रशांत यांना दुचाकीवर बसवून तोरणाळे शिवारातील जंगलात नेले. तेथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अभिषेकने प्रशांत यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. प्रशांत मृत झाल्याचा समज करून त्यांच्यावर झाडाचा पालापाचोळा टाकून अभिषेक तेथून पसार झाला.

दरम्यान, या प्रकरणी प्रशांत यांच्या आई सरला नामदेव चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१) अन्वये अभिषेक संतोष मोरे (रा. वडगाव सहो) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत चौधरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी संशयिताला सिल्लोड तालुक्यातील अंबी येथून ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहेम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव व त्यांच्या पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT