Arrest Pudhari
जळगाव

Jalgaon crime : जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ! आयुध निर्माणीत चोरीचा धाडसी प्रयत्न उधळला; दोघांना अटक

कुसुंब्यात ज्वैलर्सचे शटर उचकटले, तर भालोदमध्ये घरफोडी; लाखो लांबवले

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वरणगाव येथील आयुध निर्माणी (ऑर्डनन्स फॅक्टरी) परिसरात चोरीच्या उद्देशाने घुसखोरी करणाऱ्या दोन सराईत संशयितांना सुरक्षारक्षकांनी रंगेहात पकडले. तळवेल तालुका भुसावळ येथील या दोघांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात शासकीय गुपिते अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

गुरुवारी २३ जुलै रोजी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास आयुध निर्माणीच्या प्रतिबंधित क्षेत्रात दोन इसम संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आले. सुरक्षा चौकी क्रमांक ६ आणि ७ दरम्यान असलेल्या संरक्षण भिंतीच्या बाहेरील बाजूस त्यांची हालचाल सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. चोरी करण्याच्या च उद्देशाने त्यांनी या अत्यंत सुरक्षित परिसरात अनधिकृत प्रवेश केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना तातडीने ताब्यात घेण्यात आले.

आरोपींची नावे आणि दाखल गुन्हे

पकडण्यात आलेले दोन्ही संशयित तळवेल (ता. भुसावळ) येथील रहिवासी आहेत. निलेश बळीराम ताटे , राजेंद्र श्रीधर कोळी या प्रकरणी आयुध निर्माणीचे कनिष्ठ कार्य प्रबंधक अभिजीत गौरनपद नंदी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम १९२३ चे कलम ३ सह भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२९(३), ३०३ आणि ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुना 'क्राइम रॅकॉर्ड'

यातील मुख्य आरोपी निलेश बळीराम ताटे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीदेखील त्याच्यावर वरणगाव पोलीस ठाण्यात हत्यार चोरीच्या गुन्ह्यात गु.र.नं. १९७/२४ गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे या घुसखोरीमागे केवळ साधी चोरी होती की काही मोठा कट, याचा सखोल तपास वरणगाव पोलीस करत आहेत.

theft

एमआयडीसी आणि फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल; पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

जळगाव : जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी आता पोलीस प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. कुसुंबा (ता. जि. जळगाव) येथील 'निलेश्वरी ज्वेलर्स'चे लोखंडी शटर उचकटून चोरट्यांनी १ लाख १३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. तर दुसरीकडे, यावल तालुक्यातील भालोद येथे बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी एमआयडीसी आणि फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कुसुंब्यात 'निलेश्वरी ज्वेलर्स'वर दरोडा; १.१३ लाखांचे दागिने चोरीला

पहिली घटना कुसुंबा येथील दत्त मंदिरा जवळ घडली. राजेंद्र पंडित सोनार (वय ६२) यांचे तेथे 'निलेश्वरी ज्वेलर्स' नावाचे सोन्याचे दुकान आहे. २२ जुलैच्या रात्री ९ ते २३ जुलैच्या पहाटे ४:३० वाजेदरम्यान अज्ञातांनी दुकानाचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश केला.दुकानातील १६ सोन्याचे मणी, ओम पान, वाटी जोड, डोरले, मोहन मणी, किरणमणी, बाळी आणि तब्बल ७० फुल्यांसह २०० ग्रॅम चांदीची मोरणी असा एकूण १ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. २४ जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. ६१९/२०२६ नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पुढील तपास पो. उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत असून आरोपी अटक नाही.

भालोदमध्ये बंद घर फोडले; ५५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

दुसरी घटना यावल तालुक्यातील भालोद येथील इंदिरा नगर भागात घडली. नथू खंडू चौधरी (वय ६७, व्यवसाय: आचारी) हे १७ जुलै ते २३ जुलै दरम्यान बाहेर गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट उचकटून त्यातील सोन्याचे डोरले, मणी मंगळसूत्र, अंगठी, चांदीचे जोडवे आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम (५०० च्या ८० नोटा आणि १०० च्या १०० नोटा) असा एकूण ५५,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात CCTNS गु.र.नं. १५८/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३०५(A), ३३१(३), ३३१(४)) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय झाल्टे फैजपूर पोलीस ठाणे हे करीत आहे.

अज्ञात आरोपी अटक नाही

एकाच वेळी ग्रामीण आणि शहर परिसरात घडलेल्या या धाडसी चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि फैजपूरचे सपोनि संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस सध्या संशयितांचा शोध घेत असून, दोन्ही घटनांतील आरोपी अद्याप फरार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT