CM relief fund Pudhari file Photo
जळगाव

CM Medical Relief Fund | जळगाव जिल्ह्यात १,६१० रुग्णांना १३ कोटी ३३ लाखांची वैद्यकीय मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आरोग्यसेवा अधिक गतिमान करण्यासाठी अनेक सकारात्मक बदल

पुढारी वृत्तसेवा

CM Relief Fund beneficiaries Jalgaon

जळगाव : शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या गरजू व पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी प्रभावी आधार ठरत आहे. जळगाव जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात १,६१० रुग्णांना सुमारे १३ कोटी ३३ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आरोग्यसेवा अधिक गतिमान करण्यासाठी अनेक सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करणे, अर्ज प्रक्रिया पेपरलेस करणे आणि अर्जांचा तातडीने निपटारा करणे यामुळे मदत वितरण अधिक जलद आणि पारदर्शक झाले आहे. तसेच, सामंजस्य करार आणि क्राउड फंडिंगच्या माध्यमातून रुग्णालये, धर्मादाय संस्था आणि दाते यांचे सहकार्यही मिळत आहे.

या निधीतून कॉक्लियर इम्प्लांट (२ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस व बोन मॅरो प्रत्यारोपण, गुडघा व हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, डायालिसिस, मेंदूचे आजार, अपघातग्रस्त रुग्ण, नवजात शिशुंचे आजार तसेच भाजलेले आणि विद्युत अपघातग्रस्त रुग्ण अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

याशिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात नुकताच बालकांच्या कर्करोग उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सीएसआर अंतर्गत विशेष निधी उपलब्ध होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण उपचार घेणे अधिक सुलभ होणार आहे.

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील ४०,७७६ रुग्णांना एकूण ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात आली आहे. यापैकी जळगाव जिल्ह्यातील १,६१० रुग्णांना सुमारे १३ कोटी ३३ लाख रुपयांचे सहाय्य वितरित करण्यात आले आहे.

गरजू रुग्णांना वेळेत उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनाचे प्रयत्न सातत्याने सुरू असून, अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT