

12 lakh theft Jalgaon
जळगाव : शहरालगतच्या विमानतळ परिसरातील ‘तारा बिझनेस पार्क’मध्ये भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका व्यापाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १२ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोईज बोहरा हे कामानिमित्त बाहेर असताना चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घरावर डल्ला मारला. दुसऱ्या मजल्यावरील घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. त्यानंतर त्यांनी घरातील कपाटाचे लॉकर फोडून १० लाख रुपये रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १२ लाख १३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीस गेलेल्या रकमेत ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.
विमानतळ परिसर सामान्यतः सुरक्षित मानला जातो. मात्र, याच ठिकाणी भरवस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे सुरक्षेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चोरट्यांनी आधी घराची रेकी केली होती का किंवा या प्रकरणात कोणाचा आतला हात आहे का, याबाबतही चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी अत्यंत सराईतपणे कपाटाचे लॉकर फोडून चोरी केली आहे.
या घटनेप्रकरणी मोईज बोहरा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहूल तायडे तपास करत आहेत. पुढील तपासासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाची मदत घेण्यात येण्याची शक्यता आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, शहराच्या उपनगरांमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, दिवस-रात्र कडक पोलीस गस्त आणि सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हेगारांचा माग काढण्याची मागणी होत आहे.