Insurance Fraud Pudhari
जळगाव

Jalgaon Insurance Fraud | मृत व्यक्तीच्या नावावर अपघाती मृत्यूचा बनाव; कोट्यवधींच्या विमा फसवणुकीचा पर्दाफाश

चाळीसगाव–मेहुणबारे परिसरात खळबळ : डॉक्टर, पोलीस कर्मचाऱ्यांसह ९ जणांना अटक; ११ विमा कंपन्यांना गंडा

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Fake accident death scam

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मृत व्यक्तीच्या नावावर बनावट अपघाती मृत्यू दाखवून विमा कंपन्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वर्षभरापूर्वी नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचून तब्बल ११ विमा कंपन्यांकडून सुमारे ५० लाख रुपयांचा दावा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा मेहुणबारे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीची पत्नी, भाऊ, डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रकरणाचा तपशील

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र शालींदर जाधव (रा. पाथीमांगे, ता. मालेगाव) यांचा २३ फेब्रुवारी २०२४ रोजी नैसर्गिक मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतर आरोपींनी संगनमताने योजना आखत जाधव जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या नावावर विविध विमा कंपन्यांच्या पॉलिसी काढल्या.

त्यानंतर १९ एप्रिल २०२५ रोजी दहिवद फाट्याजवळ अपघात झाल्याचा बनाव रचून जाधव यांचा मृत्यू अपघातात झाल्याचे दाखवण्यात आले. या आधारावर श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीसह इतर १० विमा कंपन्यांकडे नुकसानभरपाईचा दावा सादर करण्यात आला.

बनावट कागदपत्रांचा वापर

या कटात केवळ नातेवाईकच नव्हे, तर काही शासकीय यंत्रणेतील व्यक्तींचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. अपघाताचा पंचनामा, वैद्यकीय कागदपत्रे आणि अन्य पुरावे तयार करून ते खरे असल्याचे भासवण्यात आले. विमा दाव्याची पडताळणी करताना संशय निर्माण झाल्यानंतर तपास सुरू झाला आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी विमा कंपनीचे अधिकारी किरण रावसाहेब शिंदे यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

९ जणांना अटक

पोलिसांनी या प्रकरणात धडक कारवाई करत एकूण ९ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मृताची पत्नी अरुणा राजेंद्र जाधव, भाऊ मिथुन जाधव, विमा प्रतिनिधी प्रवीण पाटील, डॉ. मंदार कळवेकर, पोलीस कर्मचारी सचिन निकम, हेड कॉन्स्टेबल रवींद्र बत्तीसे, तसेच महेंद्र पाटील आणि सुनील निकम यांचा समावेश आहे.

या कलमान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी मेहुणबारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१८(२), ३३६(२), ३३८, ३३६(३), ३४१(१) आणि ३४०(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे पुढील तपास करत आहेत. या रॅकेटद्वारे आणखी किती विमा कंपन्यांची फसवणूक झाली आहे आणि यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT