Girish Mahajan Slams Eknath Khadse Pudhari
जळगाव

Girish Mahajan | 'मसणात लाकडे जाईपर्यंत...; गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला कोणाला?

मंगेश चव्हाण यांच्याकडे जळगावच्या भविष्यातील नेतृत्वाची सूत्रे असल्याचे संकेत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुढारी वृत्तसेवा

Girish Mahajan Slams Eknath Khadse

जळगाव: राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगावातील एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका करत, "मसणात लाकडे जाईपर्यंत 'मीच मीच' म्हणण्याची वृत्ती थांबली पाहिजे," असा टोला लगावला. त्याचवेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्यामध्ये जळगाव जिल्ह्याचे भावी नेतृत्व पाहत असल्याचे स्पष्टपणे सांगत त्यांनी भाजपमधील नेतृत्व बदलाचे संकेत दिले.

चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकारातून विविध शासकीय कार्यालयांचे उद्घाटन आणि विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रमुख उपस्थित होते.

गिरीश महाजन म्हणाले, "भाजपने मंगेश चव्हाण यांना पहिल्यांदा उमेदवारी दिली, तेव्हा त्यांची फारशी ओळख नव्हती. ते कमी मताधिक्याने निवडून आले होते. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघात विकासकामांचा जो वेग ठेवला आहे, तो पाहून आम्हालाही त्यांच्या कामाचा हेवा वाटतो.

पुढे त्यांनी पक्षातील नेतृत्व बदलाचा मुद्दा उपस्थित करत म्हटले, "पक्षाने आणि जनतेने आम्हाला ३५ वर्षे आमदारकी आणि तीन टर्म मंत्रीपदाची संधी दिली. आता पुढच्या पिढीकडे नेतृत्व देण्याचा विचार झाला पाहिजे. सात टर्म झाल्या, आणखी किती दिवस काम करायचे? कुठेतरी थांबलेच पाहिजे."

एकनाथ खडसे यांचे नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्ष टीका करत म्हटले, "काही लोकांना कधी आणि कुठे थांबायचे हे कळत नाही. उठता-बसता येत नाही, चालताही येत नाही; तरीही 'मीच मीच' सुरू असते. मसणात लाकडे जाईपर्यंत ही वृत्ती ठेवू नका. आता लोकही मतपेटीतून उत्तर देऊ लागले आहेत."

महाजन यांनी पुढे स्पष्ट शब्दांत, "मी आमदार मंगेश चव्हाण यांच्यामध्ये जळगाव जिल्ह्याचे भावी नेतृत्व पाहत आहे. पक्षाची धुरा सक्षम आणि तरुण नेतृत्वाच्या हाती देण्याची वेळ आली आहे," असे सांगितले.

महाजन यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून केलेल्या या वक्तव्यामुळे जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात या वक्तव्याकडे केवळ मंगेश चव्हाण यांच्या कौतुकाच्या दृष्टीने नव्हे, तर आगामी काळातील नेतृत्व परिवर्तनाचे स्पष्ट संकेत म्हणून पाहिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT