

जळगाव : चोपडा ग्रामीण पोलिसांनी लासूर ते हातेड रस्त्यावरील पाटचारीजवळ रचलेल्या सापळ्यात तब्बल ७ किलो ११६ ग्रॅम गांजासह तीन तस्करांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत गांजासह कार, बाईक अन् मोबाईल असा ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींना खाकीचा हिसका दाखवत गजाआड करण्यात आले आहे.
अशी झाली थरारक कारवाई
२६ जुलैच्या रात्री ११:५३ वाजेच्या सुमारास हातेड शिवारातील पाटचारीजवळ काही संशयित अंमली पदार्थांची देवाणघेवाण करण्यासाठी येणार असल्याची पक्की बातमी चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता या परिसरात नाकाबंदी करून सापळा रचला. संशयित हुंडाई सॅन्ट्रो कार आणि पल्सर मोटारसायकल येताच पोलिसांनी त्यांना चारही बाजूंनी घेरले.
वाहनांची कसून झडती घेतली असता पोलिसांना १ लाख ७७हजार ९०० किमतीचा ७ किलो ११६ ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. याशिवाय तस्करांकडून ४१ हजार रुपयांचे ५ मोबाईल असा एकूण ६ लाख ०८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत अटक करण्यात आलेले आरोपी पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत.
विष्णू सुभाष सुळे (वय ३७, रा. पिंप्री, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे (वय ३०, रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) आणि प्रशांत ताराचंद अथाणी (वय २९, रा. टाकळीमिया, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) या तस्करांवर ‘NDPS’ अंतर्गत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २४६/२०२६ अन्वये अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act १९८५) मधील कडक कलम २०(ब) आणि २२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.