crime News pudhari photo
जळगाव

Jalgaon News: कंत्राटदाराची नफेखोरी निष्पापांच्या जीवावर बेतली; जळगाव बायपासवरील बळीनंतर ॲग्रो इन्फ्राच्या मालकावर गुन्हा

राष्ट्रीय महामार्गावरील कोट्यवधींच्या कामात केवळ नफेखोरीसाठी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या मुजोर कंत्राटदाराला जळगाव पोलिसांनी जोरदार झटका दिला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon bypass accident

​जळगाव: राष्ट्रीय महामार्गावरील कोट्यवधींच्या कामात केवळ नफेखोरीसाठी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या मुजोर कंत्राटदाराला जळगाव पोलिसांनी जोरदार झटका दिला आहे. महामार्ग क्रमांक ५३ वरील पाळधी ते जळगाव नवीन बायपासच्या निकृष्ट कामामुळे एका निष्पाप नागरिकाचा नाहक बळी गेल्यानंतर, जळगाव तालुका पोलिसांनी कंत्राटदार कंपनी 'ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड', कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंघल, जी.एम. दत्ता यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महामार्गावर निष्काळजीपणे काम करणाऱ्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.

नेमकी घटना काय?

अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या पाळधी ते जळगाव नवीन बायपासचे काम 'ॲग्रो इन्फ्रा' कंपनीने केले होते. मात्र, पहिल्याच पावसात ओव्हरब्रिजची माती खचल्याने या कामाचा निकृष्ट दर्जा चव्हाट्यावर आला. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारी म्हणून एक लेन बंद करून वाहतूक दुसऱ्या लेनवरून सुरू ठेवली होती.

दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी रात्री २ ते २.१५ वाजेच्या सुमारास ममुराबाद ते आसोदा बायपास सर्व्हिस रोडदरम्यान सुरू असलेल्या एकाच लेनवर ट्रक (MH 05 DK 5314) आणि तवेरा (MH 48 P 0755) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात तवेरामधील शांताराम केशव पाटील (वय ५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य चार प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमी रामचंद्र ईश्वर महाजन (वय १९) यांच्या फिर्यादीवरून सुरुवातीला तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

​खर्च वाचवण्यासाठी सुरक्षेशी तडजोड

रस्ता खचल्यानंतर रात्रीच्या वेळी संबंधित ओव्हरब्रिजवर योग्य बॅरिकेडिंग, रेडियम सूचना फलक आणि सुरक्षा रक्षक तैनात करणे अनिवार्य होते. मात्र, केवळ कामाचा खर्च वाचवण्यासाठी आणि बेकायदेशीर आर्थिक फायद्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडला. येथे भीषण अपघात होऊन नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो, याची पूर्ण कल्पना असतानाही दुर्लक्ष करण्यात आले.

​या निष्काळजीपणामुळे निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जळगाव तालुका पोलिसांनी सरकारतर्फे स्वतः फिर्यादी होत कंपनीचे एम.डी. शैलेंद्र सिंघल, जी.एम. दत्ता व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जळगाव तालुका पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT