

Mira Bhayandar Police MD Drug Seizure
जळगाव : मीरा-भाईंदर पोलिसांनी जळगावात कारवाई करत तब्बल ४ किलो ९११ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. या अमली पदार्थाची अंदाजे बाजारातील किंमत १ कोटी २२ लाख ७७ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. परजिल्ह्यातील पोलिसांनी जळगावात येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडीचा साठा शोधून काढल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मीरा-भाईंदर परिसरातील एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत पोलिसांचे पथक गुरुवारी जळगावात दाखल झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारीही कारवाईच्या वेळी उपस्थित होते. पथकाने मेहरुण परिसरातील रामनगर येथून रहीम ताहीर पिंजारी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर शिवाजीनगर परिसरातील उस्मानिया पार्क येथे कारवाई करून सय्यद मुशादूर अली मुमताज अली (२९) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४ किलो ९११ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली.
जळगाव शहरात यापूर्वीही एमडीची प्रकरणे उघडकीस आली असून, काही प्रकरणांत पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले होते. एका प्रकरणात उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाईही झाली होती. या पार्श्वभूमीवर आता परजिल्ह्यातील पोलिसांना एवढ्या मोठ्या साठ्याची माहिती मिळते; मात्र स्थानिक पोलिसांना त्याची खबर का लागली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, जळगाव शहर पोलिसांनी या कारवाईची केवळ नोंद करण्यात आल्याचे सांगितले असून, जप्तीबाबत स्वतंत्र अधिकृत घोषवारा देण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार का, याकडे लक्ष लागले आहे.