जळगाव : जळगाव तालुक्यातील बोरणार गावात जुन्या व किरकोळ वादाचे पर्यावसन रक्तरंजित खुनात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 18 नोव्हेंबरच्या रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास गावातील खालीद पटेल यांच्या घरासमोरील भरचौकात पाच जणांच्या टोळक्याने प्रेम गोपाल धनगर (वय २६, रा. बोरणार) या तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या थरारक घटनेमुळे संपूर्ण बोरणार गावासह जळगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, एमआयडीसी पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत पाचही आरोपींना पहाटे बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रेम गोपाल धनगर याने संशयित आरोपींना शिवीगाळ केली होती. याच रागातून मंगळवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास बोरणार येथील खालीद पटेल यांच्या घरासमोरील सार्वजनिक चौकात आरोपींनी प्रेम धनगर याला गाठले. यावेळी अनिस अजिज पटेल (वय ४५), आदील अजिज पटेल (वय ३२), सादिक मुर्शिद पठाण (वय २८, तिघे रा. बोरणार), शोएब इस्माईल पटेल (वय ३२, मूळ रा. नाचनखेडा, ता. जामनेर) आणि अश्पाक मेहमुद पटेल (वय २७, मूळ रा. यावल, सर्व सध्या रा. बोरणार) यांनी प्रेम याला बेदम मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद विकोपाला गेल्यानंतर आदील पटेल याने "इसको आज जिंदा नहीं छोड़ेंगे" अशी आरडाओरड करत प्रेमच्या पाठीवर व शरीरावर धारदार शस्त्राने जीवघेणे वार केले. वर्मी घाव बसल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रेमचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी; पाचही आरोपी जेरबंद
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, सपोनि प्रमोद वाघ व उपनिरीक्षक चंद्रकांत धानके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी मयताचा मामेभाऊ सुनिल नारायण धनगर (वय ३८, रा. जुना प्लॉट एरिया, बोरणार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पहाटे ३.४५ वाजता भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१), ११५(२), ३५१(२), ३५२, १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुन्हा दाखल होताच अवघ्या सव्वा तासात, म्हणजेच पहाटे ५.०६ वाजता पाचही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सपोनि प्रमोद वाघ करीत आहेत.