

Mahayuti Jalgaon
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने बिनविरोध निवडींचा धडाका लावत सहकार क्षेत्रातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. एकाच वेळी तीन प्रमुख नेत्यांची बिनविरोध निवड झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जळगाव मतदारसंघातून गुलाबराव पाटील बिनविरोध
जळगाव तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून पहिल्यांदाच जिल्हा बँकेची निवडणूक लढवणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विजयाचा मार्ग अखेर मोकळा झाला. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजपच्या जयश्री महाजन आणि प्रभाकर सोनवणे यांनी माघार घेतली. विशेष म्हणजे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलेल्या माघारीमुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
पाचोऱ्यातून सुमित पाटील यांची बाजी
पाचोरा विकास सोसायटी मतदारसंघातही महत्त्वपूर्ण घडामोड घडली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज सुरुवातीला छाननीदरम्यान बाद झाला होता. मात्र, अपिलात त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. त्यानंतर माघारीच्या अंतिम दिवशी अमोल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सुमित पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
जामनेरमधून गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड
जामनेर विकास सोसायटी मतदारसंघातून ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनीही पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेले भाजप कार्यकर्ते तुकाराम निकम यांनी माघार घेतल्याने महाजन यांची बिनविरोध निवड झाली.
माघारीच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या नेत्यांनी विविध उमेदवारांची समजूत काढण्यात यश मिळवले. त्यामुळे जिल्हा बँकेतील अनेक जागांवरील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, महायुतीने बिनविरोध निवडींच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील आपली ताकद दाखवून दिली आहे.