Drinking Water Crisis Bhusawal Pudhari
जळगाव

Bhusawal Water Crisis | भुसावळकर तहानलेले: बंधाऱ्याने गाठला तळ; १३ दिवसांआड पाणीपुरवठा

प्रशासकीय राजवटीतही जलसंकट कायम, 'अमृत' योजना ठरली कागदी वाघ

पुढारी वृत्तसेवा

Drinking Water Crisis Bhusawal

जळगाव : तापी आणि पूर्णा नद्यांचा वरदहस्त लाभलेले, रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन, दीपनगर औष्णिक वीज केंद्र तसेच ऑर्डनन्स फॅक्टरीसारखी महत्त्वाची केंद्रे असलेल्या भुसावळ शहराला सध्या भीषण पाणीटंचाईने वेढले आहे. नैसर्गिक जलस्रोतांची उपलब्धता असूनही पालिकेच्या निष्क्रिय आणि नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना तब्बल १२ ते १३ दिवसांआड पाणी मिळत आहे. त्यातच तापी नदीपात्रातील पालिकेचा मुख्य बंधारा पूर्णपणे कोरडा पडल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत.

बंधारा कोरडा; हातनूरच्या पाण्याची प्रतीक्षा

मुख्य बंधाऱ्याने तळ गाठल्याने नदीपात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा पूर्णपणे हतबल झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या विहिरींनीही तळ गाठल्याने टँकर आणि अग्निशमन दलाच्या वाहनांनाही पाणी भरणे कठीण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर हातनूर धरणातून भुसावळसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असले, तरी ते शहरातील बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी चार ते पाच दिवस लागणार आहेत. येत्या रविवार किंवा सोमवारपर्यंत हे पाणी उपलब्ध होण्याची शक्यता असून, त्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत होण्याची आशा आहे. तोपर्यंत मात्र नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.

खाजगी टँकरचालकांची चांदी

पालिकेकडून कोणतीही प्रभावी पर्यायी व्यवस्था करण्यात न आल्याने नागरिकांना खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी टँकरचालकांकडून मनमानी दर आकारले जात असून एका टँकरसाठी २०० रुपयांपासून थेट १,१०० ते १,५०० रुपयांपर्यंत मोजावे लागत आहेत. वाढत्या उष्णतेत आणि पाणीटंचाईत सर्वसामान्य नागरिकांची अक्षरशः आर्थिक लूट सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.

राजकारणात वेळ गेला; पाणीप्रश्न मात्र कायम

भुसावळ पालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना लोकनियुक्त नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडे होते. मात्र, नगराध्यक्षांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना पद गमवावे लागले. सध्या उपनगराध्यक्षांकडे कारभार असला तरी शहराचा मूलभूत पाणीप्रश्न सोडवण्यात पालिकेतील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दोघेही अपयशी ठरल्याची टीका होत आहे.

तालुक्याचे प्रतिनिधित्व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आणि भाजपचे प्रभावी आमदार करत असतानाही भुसावळकरांना पाण्यासाठी चातकासारखी वाट पाहावी लागत आहे. यापूर्वी प्रशासकीय राजवट असतानाही अधिकाऱ्यांच्या संथ कारभारामुळे परिस्थितीत कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही.

'अमृत' योजनेचा गाजावाजा; कामे मात्र रखडली

शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी 'अमृत-१' योजनेअंतर्गत शहरात ११ उंच पाण्याच्या टाक्यांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, अनेक ठिकाणी ही कामे अद्याप अपूर्ण आहेत. बाजार परिसरातील पाण्याच्या टाकीचे काम रखडले असून शहरभर टाकण्यात आलेल्या पाईपलाईनचे टाक्यांशी जोडणीचे महत्त्वाचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही.

दुसरीकडे 'अमृत-२' अंतर्गत फिल्टर हाऊस उभारणी आणि शेळगाव बॅरेजमधून पाणी उपसा करण्यासाठीच्या जॅकवेलचे कामही प्राथमिक टप्प्यातच रेंगाळले आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांचा लाभ नागरिकांना नेमका कधी मिळणार, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

'तापीच्या काठी तहान' कधी संपणार?

नियोजनाचा अभाव, रखडलेल्या योजना आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे भुसावळकरांना आजही १३ दिवसांनी पाणी मिळण्याची वेळ आली आहे. तापी नदीच्या काठी वसलेल्या शहरातील नागरिकांना नियमित दोन-तीन दिवसांनी पाणी कधी मिळणार, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहराला या दुष्टचक्रातून मुक्ती कधी मिळणार, याकडे संपूर्ण भुसावळचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT