Jalgaon news file photo
जळगाव

Jalgaon news: खाकीवर हात उगारताच पोलीस ॲक्शन मोडवर; भुसावळात इराणी वस्तीवर 'सर्जिकल स्ट्राईक'!

मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन: ४० लाखांच्या सोन्याच्या लगडी, गावठी कट्टा अन् १६ दुचाकी जप्त

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon news

जळगाव : मध्यप्रदेशमधील पोलीस आरोपीला पकडायला आले असता त्यांच्यावरच हल्ला करण्याची हिंमत करणाऱ्या भुसावळच्या इराणी टोळीची पोलिसांनी चांगलीच मस्ती जिरवली आहे.

मध्य प्रदेश पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी 'कोम्बिंग ऑपरेशन'चे आदेश दिले आणि खाकीचा हिसका दाखवला. या कारवाईत पोलिसांनी इराणी वस्तीतून तब्बल ४० लाख २५ हजारांच्या सोन्याच्या १६ लगडी, एक गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि १६ दुचाकी असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे महिलांच्या मदतीने चोरीचे सोने वितळवून त्याच्या लगडी बनवणाऱ्या आंतरजिल्हा रॅकेटचा यामुळे पर्दाफाश झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मध्य प्रदेशातील बडोद पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील आरोपी करारअली हुजुर अली हा भुसावळच्या मुस्लीम कॉलनी (पापा नगर) परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी १५ जानेवारीच्या रात्री मध्य प्रदेश पोलीस गेले असता, इराणी वस्तीतील महिला व पुरुषांनी पोलिसांनाच घेराव घातला. विटा, लाकडी दांडक्याने मारहाण करत आणि चक्क पोलिसांचा चावा घेत जमावाने आरोपीला पळून जाण्यास मदत केली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

एसपींचा 'अॅक्शन प्लॅन' आणि सोनेच सोने!

पोलिसांवर झालेल्या या हल्ल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. एसपी महेश्वर रेड्डी यांनी तातडीने अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी आणि बाजारपेठ पोलिसांची फौज वस्तीत उतरवली. पंचांसमक्ष घरांची झडती घेतली असता एका घरात लोखंडी कपाटात पिवळ्या धातूच्या (सोन्याच्या) १६ लगडी सापडल्या. याचे वजन २८७.७ ग्रॅम असून किंमत तब्बल ४० लाख २५ हजार रुपये आहे.

असे चालायचे रॅकेट

ताब्यात घेतलेल्या संशयित महिला मरियम बी जाफर अली जाफरी व नाझिया टिपू शेख यांनी दिलेल्या कबुलीने पोलीसही अवाक झाले. टोळीतील पुरुष (हसनअली, मजहर अब्बास, हस्नैन अली, साधीक अली इ.) जळगाव, अमरावती आणि मध्य प्रदेशात महिलांच्या गळ्यातील चेन आणि मंगळसूत्र तोडून आणत. हे चोरीचे दागिने या महिला घरातच वितळवून त्याच्या लगडी बनवत आणि विकून पैसे वाटून घेत असत.

कट्टा आणि बाईक जप्त

याच कारवाईत मजहर अब्बास जाफर इराणी (वय १९) याच्याकडून १५ हजारांचा गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच वस्तीतून ४ लाख ८० हजार किमतीच्या १६ संशयित मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

१६ गुन्ह्यांचा उलगडा

या धडक कारवाईमुळे जळगाव तालुका, जिल्हा पेठ, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा, अमळनेर आणि मुक्ताईनगर या पोलीस ठाण्यांसह अमरावती व मध्य प्रदेशातील मिळून एकूण १६ चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी एलसीबीचे पीआय राहुल गायकवाड, बाजारपेठचे पीआय राहुल वाघ स्था गु शा चे पो उप निरी शरद बागल, भुसावळ बाजारपेठ पो. स्टे. चे पो. उप. निरी . मंगेश जाधव, विजय नेरकर, रमण सुरळकर, कांतीलाल केदारे, रवींद्र भावसार, अतुल पवार, सोपान पाटील, प्रशांत सोनार, भुषण चौधरी, योगेश माळी, अमर अढाळे, हर्षल महाजन, महेंद्र पाटील, जीवन कापडे, जावेद शहा, सचीन चौधरी, सागर वंजारी, दिलीप कोल्हे, मोहसीन शेख, सिमा चौधरी, प्रियंका भोसले, सिमा चिखलकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या उप निरीक्षण कल्याणी पाटील, उप निरीक्षक रवी नरवाडे, गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT