

Kirit Somaiya Jalgaon Visit
पारोळा : पारोळा तालुक्यातील रताळे गावालगत असलेल्या ओसाड भाटपुरा गावाचे नाव थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे. या गावाच्या नावाने तब्बल ३७ हजार बोगस जन्म दाखले तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या रॅकेटचे धागेदोरे केवळ राज्यापुरते मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा येत्या महिनाभरात छडा लावण्यात येईल, असा ठाम विश्वास भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.
किरीट सोमय्या यांनी आज (दि. १९) रताळे येथील भाटपुरा गावाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या एक वर्षापासून बोगस मतदार याद्या आणि बनावट जन्म नोंदींच्या प्रकरणांचा ते पाठपुरावा करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार तपासाला गती मिळाली आहे. आतापर्यंत ३७ हजार बोगस नोंदी समोर आल्या असून, या रॅकेटचे सूत्रधार उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये असल्याचा संशय बळावला आहे. हा प्रकार केवळ कागदोपत्री गैरव्यवहार नसून, मोठ्या आंतरराष्ट्रीय घोटाळ्याचे संकेत देणारा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर रताळे ग्रामपंचायत कार्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, गटविकास अधिकारी एस. टी. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बाहेकर, तहसीलदार अनिल पाटील यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे, ज्या गावांच्या नावाने हजारो जन्म नोंदी झाल्या, त्या रताळे व भाटपुरा येथील ग्रामस्थांना या प्रकाराची कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. “आमच्या ग्रामपंचायत ऑपरेटरलाही हा प्रकार लक्षात आला नाही. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे बोगस दाखले नेमके कोणी आणि कसे तयार केले?” असा सवाल रताळ्याचे सरपंच शांताराम पाटील यांनी उपस्थित केला.
या प्रकरणावरून किरीट सोमय्या यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “या चौकशीसाठी मी स्वतः मुंबईहून इथे येऊ शकतो, पण भाजपचे जिल्हाध्यक्ष मात्र उपस्थित राहू शकले नाहीत, हे दुर्दैवी आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले असून, जिल्हाध्यक्षांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र बोहरा, अतुल पवार, रेखा चौधरी, ॲड. कृतिका आफ्रे, पराग मोरे यांच्यासह तालुक्यातील भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“या प्रकरणाबाबत स्थानिक ग्रामस्थांना कोणतीही माहिती नाही. आमच्या ग्रामपंचायत ऑपरेटरलाही हा गैरप्रकार कळला नाही.”
— शांताराम पाटील, सरपंच, रताळे