Bhadgaon Parola road bus tempo collision
जळगाव : भडगाव–पारोळा मार्गावर वाघरे गावाजवळ आज ( दि. २० ) पहाटे एसटी बस आणि खासगी टेम्पोची भीषण धडक होऊन एकाचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
सोयगावहून धुळ्याकडे जाणारी महामंडळाची एसटी बस (क्र. MH-14-BT-1984) समोरून येणाऱ्या खासगी टेम्पोला (क्र. MH-19-CY-1606) धडकली. अपघात इतका जोरदार होता की दोन्ही वाहनांतील प्रवासी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व प्रशासन मदतीसाठी घटनास्थळी धावून आले. यावेळी जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक आशुतोष शेलार यांनी तातडीने जखमींना पारोळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघातात पंकज पाटील (३०, उंदीरखेडा) यांचा मृत्यू झाला आहे. तर मीराबाई सोनवणे (५५), निलाबाई सिरसागर (७५), अंजनाबाई पाटील (७०), मनोहर पाटील (६०), रमेश चौधरी (८०), मीराबाई पाटील (८०) आणि जानवी मोरे (१९) यांच्यासह इतर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर पारोळा व भोले विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.
सागर मराठे आणि यश ठाकूर यांनी देखील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. याशिवाय रघुनाथ गणपंत सोनवणे (ढेकू) हे देखील या अपघातात जखमी झाल्याचे समजते. काही जखमींची ओळख अद्याप पटलेली नसून अधिकृत माहिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.