जळगाव: जळगाव जिल्हा बँकेच्या मुख्य प्रशासकीय इमारत आवारात लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणप्रसंगी मान्यवर. 
जळगाव

Jalgaon|जळगावला अजितदादांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

पाडळसरे धरणालाही नाव देणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य प्रशासकीय इमारत आवारामध्ये दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणावरण अत्यंत भावुक वातावरणात करण्यात आले. बारामतीनंतर राज्यात जळगाव जिल्हा बँक ही अजितदादांचा पुतळा उभारणारी राज्यातील पहिलीच सहकारी बँक ठरली आहे. या सोहळ्याला राजकीय अभिनिवेश व पक्षीय सीमा बाजूला ठेवत मंत्री, आमदार, खासदार आणि सहकार क्षेत्रातील धुरिणांनी उपस्थिती दर्शवित अभिवादन केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात पाडळसरे धरणाला अजितदादांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. दादा राष्ट्रवादीचे नेते होते, पण त्यांच्याकडे काम घेऊन गेलेल्या कोणत्याही पक्षाच्या आमदाराला किंवा कार्यकर्त्याला त्यांनी परके मानले नाही. काम होणार असेल, तर थेट होकार आणि नसेल, तर तोंडावर स्पष्ट नकार देण्याची त्यांची प्रामाणिक वृत्ती होती अशी आठवण यावेळी मंत्री पाटील यांनी सांगितली. उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसणाऱ्या पाडळसरे धरणाला 'अजितदादा पवार' यांचेच नाव द्यावे, या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कधीही नकार देणार नाहीत. आम्ही सर्व जण यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

आ. अनिल पाटील यांनी दादांचा पुतळा उभारणीत काही अधिकाऱ्यांनी निर्माण केलेल्या अडचणींवर टीका करताना, राज्यात अवैध धंदे, दारूचे अड्डे आणि पत्ते क्लब विनापरवाना बिनदिक्कत चालतात; मात्र महापुरुषांचा पुतळा बसवायचा झाल्यास, अधिकारी वर्ष-दीड वर्ष फायली अडवून ठेवतात असा टोला लगावला. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सहकार चळवळीतील दादांच्या दूरदृष्टीचा गौरव केला. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दादांच्या बारामतीपासूनच्या ऋणानुबंधांना उजाळा दिला.

यावेळी मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री संजय सावकारे, खा. स्मिता वाघ, आ. मंगेश चव्हाण, आ. अनिल पाटील, आ. राजूमामा भोळे, माजी आ. चंदूअण्णा सोनवणे, शिरीष पाटील, सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी खा. ईश्वर जैन, बँकेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन अमोल पाटील यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT