Ajanta Chowphuli hotel waiter murdered
जळगाव : अजिंठा चौफुली परिसरातील बाबा बॅटरीसमोर पडलेला मृतदेह 'बेवारस' असावा किंवा नैसर्गिक मृत्यू असावा, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या काही तासांतच थरारक उलगडा केला. हा निर्घृण खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. क्षुल्लक वादातून एका हॉटेल वेटरला लाथाबुक्क्यांनी तुडवून आणि गळा दाबून ठार मारल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एकाला बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ९ जानेवारी रोजी अजिंठा चौफुलीलगत बाबा बॅटरीसमोर एक ५०-५५ वयोगटातील व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. एमआयडीसी पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरुवातीला ही व्यक्ती भिकारी किंवा बेवारस असावा, असा कयास लावला जात होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना खबऱ्यामार्फत हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीमुळे झाल्याची माहिती मिळताच एलसीबीचे पथक कामाला लागले.
तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पिंजून काढले. तसेच गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून मयताची ओळख पटली. भाऊसाहेब अभिमन पवार (वय ५८, रा. पातोंडा, ता. अमळनेर) असे मृताचे नाव आहे. ते सध्या जळगावातील असोदेकर श्री मटन हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते.
तपासात निष्पन्न झाले की, हुसेन शेख आयुब शेख (वय ३०, रा. ट्रान्सपोर्ट नगर, जळगाव) याने भाऊसाहेब पवार यांना अमानुष मारहाण केली. केवळ मारहाण करून तो थांबला नाही, तर त्यांचा गळा दाबून जीव घेतला. गुन्हा केल्यानंतर आरोपी अजिंठा चौक, ट्रान्सपोर्ट नगर परिसरात निर्धास्तपणे फिरत होता. एलसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याला ट्रान्सपोर्ट नगर भागातून उचलले आणि एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार अक्रम शेख, मुरलीधर धनगर, किशोर पाटील आणि राहुल कोळी यांच्या पथकाने केली. आरोपीवर बीएनएस २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि गणेश वाघ करीत आहेत.