

Jamner Talathi Bribe Case
जळगाव: बिनशेती प्लॉटच्या फेरफार नोंदी घेऊन सातबारा उताऱ्यावर नावे लावण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जामनेर येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. वसीम राजू तडवी असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
जामनेर येथील एका तक्रारदाराने १६ डिसेंबर २०२५ रोजी दोन बिनशेती (NA) प्लॉट खरेदी केले होते. या प्लॉटच्या खरेदीखतानंतर स्वतःचे आणि पत्नीचे नाव सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात संपर्क साधला होता. फेरफार नोंदी पूर्ण करून सातबारा देण्याच्या मोबदल्यात तलाठी वसीम तडवी याने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
एसीबीचा सापळा आणि कारवाई
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, मंगळवारी तडजोडीअंती ४ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जामनेर येथे सापळा रचला आणि लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी वसीम तडवी याला रंगेहात अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, बाळू मराठे, भूषण पाटील यांच्या पथकाने केली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे