Sand Mining File Photo
जळगाव

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राईक! एकाच दिवसात ४ ट्रॅक्टरसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली असून धरणगाव, सावदा, रावेर आणि जळगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon News

जळगाव: जिल्ह्यात वाळू माफियांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली असून धरणगाव, सावदा, रावेर आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत वाळूसह लाखो रुपये किमतीचे ट्रॅक्टर आणि ट्रॉल्या जप्त करण्यात आल्या असून सर्व घटनांमध्ये आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१. धरणगावात साळवा जवळ ४ लाखांचा ट्रॅक्टर जप्त; चालकावर गुन्हा

धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारणे ते निशाणे रोडवरील साळवा गावाजवळ बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारा विना क्रमांकाचा सोनालीका ट्रॅक्टर धरणगाव पोलिसांनी जप्त केला. संशयित आरोपी शालिक संजय चव्हाण (वय २६, रा. नारणे, ता. धरणगाव), विवेक शेषराव सपकाळे याचा शोध सुरू आहे.

४ लाख रुपये किमतीचा विना क्रमांकाचा सोनालीका ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली असा एकूण किंमत ४ लाख १० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कर्मचारी राहुल प्रमोद निकम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुधीर चौधरी तपास करत आहेत.

२. सावद्यात पवननगरजवळ १२ लाखांच्या स्वराज ट्रॅक्टरसह वाळू जप्त

सावदा ते फैजापूर रस्त्यावरील पवननगर परिसरात बेकायदेशीररीत्या वाळू भरून जात असलेला स्वराज ७४४ ट्रॅक्टर सावदा पोलिसांनी ताब्यात घेतला. यामध्ये सुरेश जगन्नाथ सोनवणे (वय ४८, रा. यावल) याला ताब्यात घेण्यात आले आहे. १२ लाख रुपये किमतीचा स्वराज ट्रॅक्टर-ट्रॉली (एम एच 40 ए एम 328) आणि ६,००० रुपयांची १.५ ब्रास वाळू, असा एकूण किंमत १२ लाख ६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी राकेश चांगो रावेर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सानप यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार जाकीर मन्सुरी तपास करत आहेत.

३. रावेरच्या पाल शेरीनाक्यावर नाकाबंदीदरम्यान कारवाई; चालक ताब्यात, मालक फरार

पाल-खरगोन रस्त्यावरील पाल शेरीनाका पोलीस चौकीसमोर नाकाबंदीदरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारा विना क्रमांकाचा निळ्या-पांढऱ्या रंगाचा स्वराज ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. यावेळी चालक अमीन शब्बीर तडवी जमीन (वय २२, रा. पाल, ता. रावेर) आणि मालक अकील लतीब तडवी (रा. पाल) हे फरार झाले.

२ लाख रुपये किमतीचा स्वराज ७४४ ट्रॅक्टर, ५० हजार रुपयांची ट्रॉली आणि दीड ब्रास वाळू असा एकूण किंमत रु. २ लाख ५० हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी विशाल शिवाजी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगदीश पाटील पुढील तपास करत आहेत.

४. ममुराबाद रस्त्यावर वाळूने भरलेला ट्रॅक्टर सोडून चालक पसार

ममुराबाद ते खेडी रस्त्यावर बेकायदेशीर वाळू भरून सुसाट वेगाने निघालेल्या ट्रॅक्टर चालकाने महसूल पथकाला पाहून ट्रॅक्टर रस्त्यावरच सोडून पळ काढला. पथकाने ३ लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि २४,२३० रुपयांची १ ब्रास वाळू असा एकूण किंमत रु. ३ लाख, २४ हजार २३० रुपयाचा मुद्देमाला जप्त केला आहे. मंडळ अधिकारी उद्धव आंधळे (असोदा) यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस कर्मचारी देविदास पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT