

जळगाव: मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत त्याच्याच पत्नीवर वाईट नजर ठेवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या अन् विरोध केल्यावर गळा आवळून तिची हत्या करणाऱ्या नराधम दिराला जळगाव सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि विविध कलमांखाली सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. प्रवीण छगन बैरागी (वय २६, रा. कुंझर, ता. चाळीसगाव) असे या आरोपीचे नाव असून, पुरावे नष्ट करण्यात मदत करणाऱ्या त्याच्या आई लीलाबाई बैरागी हिला तीन वर्षांची सक्तमजुरी ठोठावण्यात आली आहे.
पिडीत महिलेचा पती सी.आय.एस.एफ. (CISF) मध्ये कार्यरत असून तो चेन्नई येथे कर्तव्यावर होता. आरोपी प्रवीण हा तिच्याकडे सतत वाईट नजरेने पाहत शरीर सुखाची मागणी करत असे. या त्रासाला कंटाळून ती काही काळ माहेरी निघून गेली होती. मात्र, नातेवाईकांनी मध्यस्थी करून तिला पुन्हा सासरी पाठवले. ३ जुलै २०१८ च्या रात्री, नराधम प्रवीणने तिच्यावर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न केला. तिने तीव्र प्रतिकार केला असता, त्याने तिचा गळा आवळून खून केला.
घटनेच्या वेळी मृत महिलेची लहान मुलगी बाजूलाच झोपलेली होती. ती जागी झाल्याने तिने प्रत्यक्ष पाहिलेली घटना न्यायालयात अत्यंत महत्त्वाची ठरली. याशिवाय, डॉक्टरांनी मृतदेहाच्या गळ्यावरून जप्त केलेले बारीक कण आणि गुन्ह्यात वापरलेली दोरी यांचे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेतील अहवाल तंतोतंत जुळले. तपास अधिकारी ए.पी.आय. दिलीप शिरसाठ, ए.पी.आय. जयपाल हिरे, पी.एस.आय. हेमंत शिंदे आणि जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी आरोपींना खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
आरोपी १ - प्रवीण बैरागी:भा.द.वि. ३०२ (खून): जन्मठेप आणि २०,००० दंड (दंड न भरल्यास २ महिने साधी कैद).
बलात्काराचा प्रयत्न: ५ वर्षे सक्तमजुरी आणि ₹१०,००० दंड.
पुरावे नष्ट करणे: ३ वर्षे सक्तमजुरी आणि ₹५,००० दंड.
आरोपी २ - लीलाबाई बैरागी (सासू):पुरावे नष्ट करणे: ३ वर्षे सक्तमजुरी आणि ₹५,००० दंड.
या खटल्यात पोलीस पैरवी अधिकारी अमोल पाटील यांनी महत्त्वपूर्ण मदत केली. न्यायदेवतेच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना, पण न्याय मिळाला आहे. दंडाच्या रकमेतून पस्तीस हजार रुपये मयत महिलेच्या मुलीला देण्यात यावे असा पण आदेश केला आहे.वीस हजार दंड न भरल्यास चार महिने साधा कारावास देण्याचेही आदेश दिले आहे