Raver Elderly Woman killed
जळगाव : पत्नीला नांदायला आणण्यासाठी पैशांची गरज भासल्याने एका १९ वर्षीय सालदाराने काम करत असलेल्या घरातील ७२ वर्षीय वृद्धेचा बेल्टने गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील दोधे येथे बुधवारी (दि.२३) दुपारी उघडकीस आली. ललिताबाई वसंत पाटील (वय ७२, रा. दोधे, ता. रावेर) असे मृत महिलेचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयित सालदाराला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून मृत महिलेचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाला धर्मा भिलाला (वय १९, मूळ रा. नसिराबाद बोरी, ता. नेपानगर, जि. बुऱ्हाणपूर; सध्या रा. प्रकाश पाटील यांचा वाडा, दोधे) हा ललिताबाई यांच्या घरात सालदार म्हणून काम करत होता.
काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. तिने नांदायला परत येण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले. पैसे न दिल्यास दुसरे लग्न करण्याची धमकी पत्नीने दिल्याने आरोपी पैशांसाठी अस्वस्थ होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बुधवारी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास ललिताबाई घरात एकट्या असल्याची संधी साधून आरोपी घराच्या मागील बाजूने आत शिरला. त्यानंतर त्याने स्वतःच्या कमरेचा बेल्ट काढून ललिताबाई यांच्या गळ्याभोवती आवळला. यात त्यांचा मृत्यू झाला.
खून केल्यानंतर आरोपीने त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. गळ्यातील दोन हार आणि कानातील दागिने घेऊन त्याने घटनास्थळावरून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर आरोपी गावातच नेहमीप्रमाणे वावरत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी संशयावरून त्याला तातडीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीने लपवून ठेवलेले ललिताबाई यांचे दोन हार आणि कानातील दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. खून आणि चोरीच्या या प्रकरणात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे दोधे गावात एकच खळबळ उडाली असून, घरात एकट्या असलेल्या वृद्ध महिलेच्या निर्घृण हत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.