

Jalgaon Financial Dispute
भडगाव : गावोगावी फिरून रुद्राक्ष विक्री करणाऱ्या पारधी समाजातील दोन नातेवाईकांमध्ये केवळ ८०० रुपयांच्या व्यवहारावरून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाले. आरोपीने दगडाने मारहाण करून मामेभावाची हत्या केल्यानंतर त्याच्या तोंडातील दातही दगडाने तोडून बॅगेत ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भडगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून मृताचे तोडलेले दात आणि दोन जिवंत कबुतरे असलेली बॅग जप्त करण्यात आली आहे.
या घटनेत धर्मा जुगा पवार ( वय ४०) याचा मृत्यू झाला असून, त्याचा नातेवाईक जुगा कांतिलाल पवार (वय ३०) याला पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही गावोगावी फिरून रुद्राक्ष विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी धर्मा पवार याने सुमारे ८०० रुपयांचे रुद्राक्ष विकले होते. त्यानंतर सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास दोघेही स्टेशन परिसरातील शेताजवळ दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी रुद्राक्ष विक्रीतून मिळालेल्या पैशांच्या वाटणीवरून त्यांच्यात वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी जुगा पवार याने धर्मा याच्यावर दगडाने हल्ला केला. गंभीर मार लागल्याने धर्माचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात शोधमोहीम सुरू असताना शेताजवळ काही कुत्रे एका ठिकाणी भुंकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्या दिशेने जाऊन पाहिले असता आरोपी जुगा पवार हा दारूच्या नशेत तेथे बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
आरोपीकडील बॅगेची झडती घेतली असता त्यात मृत धर्मा याचे दगडाने तोडलेले दात आढळून आले. त्याच बॅगेत दोन जिवंत कबुतरेही आढळली. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी ही कबुतरे खाण्यासाठी घेऊन जात असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी भडगाव पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. खुनाचा नेमका घटनाक्रम, ८०० रुपयांच्या व्यवहारातील वादाचे स्वरूप तसेच मृताचे दात तोडण्यामागील कारण याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.