Government Medical College Dhule Pudhari
जळगाव

Jalgaon GMC Workers Protest | घाम गाळूनही खिशात खडखडाट; शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप अनावर

जीएमसीत ३५० कर्मचाऱ्यांचा ठिय्या; दोन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी अधिष्ठाता कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी

पुढारी वृत्तसेवा

Government Medical College Jalgaon

जळगाव : रुग्णालयातील स्वच्छता आणि रुग्णसेवेची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) संतप्त वातावरण निर्माण झाले. थकीत वेतन तातडीने अदा करावे, या मागणीसाठी सुमारे ३५० कंत्राटी सफाई कर्मचारी आणि वॉर्डबॉय यांनी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आंदोलकांनी अधिष्ठाता कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला.

जीएमसीमधील स्वच्छता आणि रुग्णसेवेचे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. वेतनासाठी संबंधित ठेकेदार कंपनी आणि प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागला नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. अखेर संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या दिला.

यानंतर आंदोलकांनी थेट अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या कार्यालयाबाहेर जाऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर ठेकेदार ‘स्मार्ट कंपनी’चे जिल्हा व्यवस्थापक दत्ता पाटील आणि सहाय्यक अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. येत्या दोन दिवसांत सर्व कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले.

दरम्यान, केवळ आश्वासनांवर प्रश्न सोडविला जाऊ नये, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. यापुढे प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत वेतन खात्यावर जमा झाले पाहिजे. अन्यथा काम बंद आंदोलन करून रुग्णालयाचे कामकाज ठप्प करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT