Dhule News : धुळ्यात 'एफडीए'ची मोठी कारवाई; गुजरातवरून आलेला साडेसोळा लाखांचा खवा भेसळीच्या संशयातून जप्त

अहमदाबाद-अकोला मार्गावर नाकेबंदीदरम्यान कारवाई
Dhule News
गुजरातवरून आलेला साडेसोळा लाखांचा खवा भेसळीच्या संशयातून जप्त
Published on
Updated on

धुळे : अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार राबवण्यात येत असलेल्या 'सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र' या मोहिमेअंतर्गत धुळ्यात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली. अहमदाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्स बसमधून सुमारे १६ लाख ५२ हजार १०० रुपये किमतीचा ५ हजार ३८५ किलो खवा भेसळयुक्त असल्याच्या संशयातून जप्त करण्यात आला.

अहमदाबादवरून अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या एका आराम बसमधून (क्रमांक: MP-44-ZF-7214) मिठाईसाठी लागणाऱ्या खव्याची अवैध व भेसळयुक्त वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन तसेच धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मोराणे हद्दीतील साक्री रोडवर 'हॉटेल बालाजी' जवळ वाहनाची कसून तपासणी केली.

१३ कंपन्यांचे नमुने प्रयोगशाळेत रवाना

तपासणीदरम्यान वाहनामध्ये विविध १३ कंपन्यांचा एकूण ५,३८५ किलो खवा आढळून आला. भेसळीच्या संशयावरून हा संपूर्ण साठा तात्काळ जप्त करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी टोलनाक्याजवळील 'डिसान कोल्ड स्टोरेज'मध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी या खव्याचे विविध नमुने (सॅम्पल्स) विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई निश्चित केली जाणार आहे.

ही कारवाई सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, अरविंद राऊत, मंगेश भावसार तसेच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक खकीदा सय्यद, सतीश कोठावदे, पंकज पाटील, विजय वायसे, भटू पारधी आणि रवी राजपूत यांच्या संयुक्त पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news