

Songir Phata Someshwar Mahadev Temple
धुळे : सोनगीर ते दोंडाईचा राज्यमार्गाच्या विस्तारीकरणाच्या पार्श्वभूमीवर सोनगीर फाटा ते प्राचीन सोमेश्वर महादेव मंदिरापर्यंतच्या मार्गावर दुभाजक आणि दुतर्फा पथदीप उभारण्याच्या कामाचा शुभारंभ पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. नारळ वाढवून रावल यांनी कामाला प्रारंभ केला.
सोनगीर येथील प्राचीन सोमेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. तसेच विवाह सोहळे आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात वर्षभर नागरिकांची वर्दळ असते. मंदिरासमोरच श्री दत्तप्रभूंचे मंदिर असून, दोन्ही मंदिरांच्या स्वतंत्र तिथींना यात्रा भरत असल्याने या परिसरात भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे मंदिराकडे जाणारा मार्ग सुरक्षित, सुस्थितीत आणि प्रकाशयुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत होती.
सध्या सोनगीर ते दोंडाईचा राज्यमार्गाच्या विस्तारीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोनगीर फाटा ते सोमेश्वर महादेव मंदिरापर्यंत दुभाजक आणि दुतर्फा पथदीप बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री रावल यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
सोनगीर फाटा ते सोमेश्वर महादेव मंदिरादरम्यान सुमारे ५० मीटर लांबीचा दुभाजक उभारण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण मार्गावर दुतर्फा पथदीप बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्याबरोबरच मंदिरात येणाऱ्या भाविकांचीही मोठी सोय होणार आहे.
दरम्यान, सोमेश्वर महादेव आणि दत्तप्रभू मंदिर परिसराच्या पर्यटन विकासासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीला मंत्री रावल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
सोनगीर फाटा ते सोमेश्वर मंदिरादरम्यान रस्त्याचे चौपदरीकरण करून दुभाजकावर हायमास्ट दिवे बसविण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. या कामासाठी धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी पालकमंत्री रावल यांच्याशी चर्चा करून सातत्याने पाठपुरावा केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आर. के. माळी, बेहेडचे सरपंच रावसाहेब गिरासे, माजी सभापती पंकज कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती डॉ. आर. जी. खैरनार, सोनगीर प्रशासक सरपंच लखन ठेलारी, मोतीलाल माळी, भाजप शहराध्यक्ष साहेबराव बिरारी, पराग देशमुख, अमित बागूल, किशोर पावनकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.