Online Fraud 
जळगाव

Online Fraud | वेडिंग इन्व्हिटेशन' फाईल पडली महागात; भुसावळात निवृत्त शिक्षिकेला पावणेचार लाखांचा गंडा

'डिजिटल' चोरांनी मोबाईल हॅक करून बँक खाते केले साफ; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : लग्नाची डिजिटल पत्रिका डाऊनलोड करणे भुसावळातील एका सेवानिवृत्त शिक्षिकेला पुरते अंगाशी आले आहे. सायबर भामट्यांनी व्हॉट्सॲपवर पाठवलेली ‘वेडिंग इन्व्हिटेशन’ नावाचे घातक ॲप्लिकेशन डाऊनलोड करताच, क्षणार्धात मोबाईल हॅक करून बँक खात्यातून तब्बल ३,८८,३२७ रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनिझा कौसर फरीद खान पठाण (वय ६३, रा. गडकरीनगर, भुसावळ) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त महिला शिक्षिकेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुनिझा कौसर फरीद खान पठाण (वय ६३, रा. गडकरीनगर, भुसावळ) या त्यांच्या गडकरीनगर येथील राहत्या घरी असताना, गेल्या १२ एप्रिलच्या रात्री ११ ते १३ एप्रिलच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात सायबर गुन्हेगाराने त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर 'wedding invitation.apk' नावाची एक फाईल पाठवली. ओळखीच्या कोणाचे तरी लग्नाचे निमंत्रण असावे, या समजुतीने त्यांनी ती फाईल ओपन केली. मात्र, ती फाईल डाऊनलोड होताच सायबर चोरांनी त्यांचा संपूर्ण मोबाईल हॅक केला.

मोबाईलचा ताबा मिळवताच भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यात प्रवेश करून टप्प्याटप्प्याने एकूण ३,८८,३२७.०१ रुपये लंपास केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, मुनिझा खान यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार २३ जून रोजी दुपारी बाजारपेठ पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३१८(४) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या लग्नसराई आणि कार्यक्रमांच्या नावाखाली व्हॉट्सॲपवर '.apk' फॉरमॅटमधील फाईल्स पाठवून मोबाईल हॅक करण्याचे प्रमाण वाढले आहे. अज्ञात क्रमांकावरून आलेली कोणतीही फाईल डाऊनलोड करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल टी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल तायडे पुढील तपास करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT