Bhusawal Municipal Council BJP majority
जळगाव : भुसावळ नगरपालिकेत सध्या सत्तेचा असा काही 'अजब-गजब' पेच निर्माण झाला आहे की, ज्याचे उत्तर शोधताना सर्वसामान्यांची मती गुंग होत आहे. जनतेने पालिकेत २७ नगरसेवकांसह भाजपला स्पष्ट बहुमत दिले असले, तरी सत्तेची चावी मात्र 'तुतारी' (राष्ट्रवादी शरद पवार गट) कडे असल्याने पालिकेचा कारभार पूर्णतः कोलमडला आहे.
सोमवारी (दि. २३) नियोजित असलेली सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी कोणत्याही ठोस कारणाशिवाय अचानक स्थगित केल्याने गेल्या तीन सभांपासून सुरू असलेला हा 'तहकुबीचा फार्स' अखेर चव्हाट्यावर आला आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय गणितांनंतर तुतारी गटाच्या गायत्री भंगाळे या खुर्चीवर विराजमान झाल्या. मात्र, सभागृहात भाजपचे २७ सदस्य असताना तुतारीचे अवघे १२ सदस्य आहेत. तरीही सत्तेचा वापर करून भाजपच्या बहुमताला केराची टोपली दाखवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप होत आहे. २३ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता होणारी सभा २० तारखेलाच स्थगित केल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामुळे संभ्रम वाढला.
भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी थेट सत्तेच्या गैरवापराचा आरोप केला आहे. "सभा तहकूब केल्याची नोटीस २० तारखेची असताना नगरसेवकांना ती २२ तारखेला का मिळाली? पालिकेत बेकायदेशीर कामे सुरू असून ती रेटून नेण्यासाठीच हा सभा पुढे ढकलण्याचा खेळ सुरू आहे. आम्ही आमचे बहुमत सिद्ध करण्यासाठी पालिकेत हजेरी लावली असून, कोणतेही बेकायदेशीर काम होऊ देणार नाही," असा इशारा लोणारी यांनी दिला आहे.
दुसरीकडे, माजी आमदार संतोष चौधरी हे स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत आले असल्याने, नगराध्यक्षांच्या माध्यमातून तेच पडद्यामागून कारभार चालवत असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. यापूर्वीही भुसावळ पालिकेत सत्तेच्या संघर्षातून दंगलीसारखे प्रकार घडले असल्याने, सध्याचे वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण बनले आहे.
१. १३ मार्च: विविध निवेदनांमुळे पहिली सभा तहकूब झाली.
२. १७ मार्च: माध्यमांना प्रवेशबंदी आणि निवेदने स्वीकारण्यावरून झालेल्या वादात दुसरी सभाही बारगळली.
३. २३ मार्च: तिसऱ्या सभेपूर्वीच स्थगितीची नोटीस काढून लोकशाहीचा गळा आवळल्याची भावना व्यक्त होत आहे.
एककीडे कामकाज ठप्प असतानाच नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्रावरूनही न्यायालयात वाद सुरू आहे. त्यामुळे ही खुर्ची किती दिवस टिकणार आणि भाजप आपले बहुमत वापरून विकासकामे कशी मार्गी लावणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
भाजप: २७
राष्ट्रवादी (शरद पवार गट) : १२
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ०२
शिवसेना (शिंदे गट) : ०२
काँग्रेस: ०३
अपक्ष: ०४