

जळगाव : रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि रुळांवरील संभाव्य अपघात टाळले जावेत, यासाठी आपल्या प्राणाची आणि वेळेची पर्वा न करता कर्तव्यावर तैनात राहणाऱ्यांमध्ये रेल्वेच्या १२ शिलेदारांना सोमवारी गौरविण्यात आले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांच्या हस्ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे या सतर्क कर्मचाऱ्यांना 'संरक्षा पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये जळगाव रेल्वे स्थानकावरील प्रवाशाचा जीव वाचवणारे आरपीएफ जवान विजय सुरडकर यांच्यासह भुसावळ विभागातील तिघांचा समावेश आहे.
काय आहे पुरस्काराचे स्वरूप?
सतर्कता, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठा दाखवून मोठे अपघात टाळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला पदक, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि ३,५०० रुपये रोख देऊन गौरवण्यात आले.
जळगाव आणि भुसावळच्या शिलेदारांची कामगिरी
१. विजय सुरडकर (कॉन्स्टेबल, आरपीएफ, जळगाव): दि. २ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव स्थानकावर धावत्या गाडीत चढताना पडणाऱ्या एका प्रवाशाला सुरडकर यांनी अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. त्यांच्या या तत्परतेमुळे प्रवाशाचा जीव वाचला.
२. फुल कुमार गौतम (लोको पायलट, भुसावळ): १९ जानेवारी रोजी गाडी क्र. १२४०६ चालवत असताना रुळावर काम करणाऱ्या ट्रॅक मेंटेनरला त्यांनी पाहिले. शिटी वाजवूनही तो बाजूला न झाल्याने गौतम यांनी तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावून मोठा अनर्थ टाळला.
३. राहुल चंदा (एमएसएम, भुसावळ): ९ जानेवारी रोजी मालगाडीच्या तपासणीदरम्यान त्यांनी बोगी बोल्स्टरमधील दोष शोधून काढला, ज्यामुळे भविष्यातील रेल्वे अपघात टळण्यास मदत झाली.
इतर विभागातील पुरस्कारप्राप्त कर्मचारी
मुंबई विभागातून लक्ष्मण जाखरे, पंढरीनाथ नाडेकर, रणजीत कुमार यादव, नागपूर विभागातून अनुराग श्रीवास्तव, प्रदीप निर्मळ, उमेश मौर्य, सोलापूर विभागातून उमेश बदर, भानुदास शेळके आणि पुणे विभागातून कंचन कुमार यांनाही त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी गौरवण्यात आले.
सतर्कता हीच आमची ताकद - महाव्यवस्थापक
यावेळी बोलताना महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी म्हणाले की, "या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सतर्कता इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि मालमत्तेचे रक्षण हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे." या कार्यक्रमाला प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी चंद्रकिशोर प्रसाद यांच्यासह मध्य रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जळगावचा 'सुरक्षा' पॅटर्न:
जळगाव स्थानकावर आरपीएफ जवान विजय सुरडकर यांनी दाखवलेले प्रसंगावधान सध्या रेल्वे वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, जळगावकरांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.