

Bhopal Criminal Arrested in Bhusawal
जळगाव : मध्य प्रदेशातील भोपाळ येथे गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झालेल्या शादाब रईस कुरेशी (वय ३५) या सराईत गुन्हेगाराला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि मॅगझीन जप्त करण्यात आले असून, तो भुसावळात मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशानुसार बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत होते. याचदरम्यान, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त माहिती मिळाली की, बस स्थानकाजवळील रिक्षा स्टॉप परिसरात एक संशयित व्यक्ती शस्त्रासह थांबली आहे.
माहितीची खात्री करून पोलिसांनी तातडीने परिसराला वेढा घातला. पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुरेशीला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून गावठी कट्टा सापडला.
चौकशीत कुरेशी हा भोपाळ पोलिसांच्या नोंदीतील ‘हिस्ट्रीशिटर’ असल्याचे उघड झाले. त्याने १४ मार्च २०२६ रोजी अशोका गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीवर गोळीबार केला होता आणि तेव्हापासून तो फरार होता. भुसावळ पोलिसांनी या अटकेची माहिती भोपाळ पोलिसांना दिली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भारती काळे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर करत आहेत.