उत्तर महाराष्ट्र

मालेगाव : मिरवणूक मार्ग बदलला ही अफवाच ; अप्पर पोलिस अधीक्षकांचे स्पष्टीकरण

गणेश सोनवणे

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
चैत्रोत्सवासाठी सप्तश्रृंग गडावर निघालेल्या भाविकांची अडवणूक होऊन डीजेवर दगडफेकीच्या घटनेनंतर अफवांचे पीक आले आहे. खान्देशातून पायी येणार्‍या भाविकांना शहराबाहेरून वळविण्यात येत असल्याची वार्ता पसरली. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी छावणी पोलिस ठाणे गाठून समाजकंटकांच्या दबावात यात्रामार्ग बंद करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला. याठिकाणी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी स्पष्ट करित पारंपरिक मिरवणूक मार्गात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याचे सांगून याठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात असल्याची खात्री दिली.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंगी गडावर चैत्रोत्सव सुरु झाला आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर यात्रा भरत असल्याने उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक आदिमायेच्या दर्शनासाठी तळपत्या उन्हात पायी निघाले आहेत. त्यांना देशभरातील कलुषित वातावरणाचा फटका बसण्याची चिन्हे दिसून आलीत. सोमवारी (दि.11) रात्री आठ वाजेच्या सुमारास शिरपूरच्या भाविकांना अडविण्यात येऊन डीजेवर दगडफेक झाली. या घटनेनंतर काहीकाळ गोंधळ उडून छावणी पोलिस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटनांनी ठिय्या दिला. कृषिमंत्री दादा भुसे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा करित मिरवणूकमार्गावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याची सूचना केली. तसेच हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई होईल, याची शाश्‍वती देत आंदोलकांना माघारी फिरवले.

या घटनेचे पडसाद उमटू नयेत, यासाठी पोलिस प्रशासनाने अतिरिक्त खबरदारी घेतली. मात्र, मंगळवारी पारंपरिक मिरवणूक मार्ग रोखण्यात आल्याची बाब सोशल मीडियातून पसरली. त्यामुळे भाजप, मनसे, सार्वजनिक नागरी सुविधा समिती, विश्‍व हिंदू परिषद, शिवसेना आदी पक्ष-संघटनांच्या प्रतिनिधींनी छावणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मिरवणूक मार्ग बदलण्यात तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. अपर पोलिस अधीक्षक खांडवी यांनी मिरवणूक मार्ग रोखण्यात आलेला नाही अथवा बदलण्यातही आलेला नसून ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. शिवाय, सोमवारच्या घटनेनंतर या मार्गावर चोख बंदोबस्त नियुक्त केला असून, त्या हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यापूर्वीच काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याने अफवांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

पवारवाडीत अज्ञातांवर गुन्हा दाखल
सोमवारी रात्री घडलेल्या घटनेप्रकरणी शिरपूरच्या रोहित वाडिले (21) या जय भद्रा मंडळाच्या सदस्याने छावणी पोलिस ठाण्यात दिलेली तक्रार झिरो नंबरने पवारवाडी पोलिस ठाण्यात वर्ग होऊन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ते 12 ते 13 सहकार्‍यांसह पायी वणी गडाकडे जात होते. दरेगावमध्ये सहा वाजता पोहोचले. रमजान महिना सुरु असल्याने त्यांनी नमाज झाली असल्याची मुस्लिम व्यक्तींकडून खात्री करुन घेतली. तोपर्यंत डीजे बंद ठेवला. फारान हॉस्पिटलपर्यंत आले असता तीन – चार जणांनी त्यांची गाडी रोखली. तेव्हा पाठीमागून 6-7 लहान मुलांनी डीजेवर दगडफेक केली. या गोंधळाचा फायदा घेत विनोद पाटील (रा. तामसवाडी, ता. पारोळा) याचा मोबाईल चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

भाविकांना संरक्षण द्या..
सप्तश्रृंग गडावर पायी जाणार्‍या भाविकांना संरक्षण देऊन दगडफेक करणार्‍या दोषींवर कारवाही करावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने अपर पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. नेहमीच निरनिराळी कारणे काढून कधी प्रशासनाकडून, तर कधी समाजकंटकाकडून या भाविकांना वेठीस धरले जाते असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. काही वर्षांपूर्वी पोलिस प्रशासनाने सदर भाविकांना पारंपारिक मार्ग बदलण्यात सांगण्यात आले होते. तर एकदा भाविकांच्या पालखींना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यास आक्षेप घेण्यात आल्यानंतर नोटीस प्रपंच थांबविला गेला. आता सोमवारच्या घटनेचे भांडवल करुन मिरवणूक मार्ग बदलण्याचा प्रयत्न झाल्यास भाविकांच्या भावनांचा उद्रेक होईल, असा संभाव्य इशारादेखील यावेळी देण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, व्यापारी आघाडी प्रदेश समन्वयक नितीन पोफळे, जिल्हा संघटक सरचिटणीस देवा पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT